
“आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी राज्यात 240 जागा लढवण्याचा विचार करत आहे. यासाठी तयारीला लागा”, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं आहे. बावनकुळेंच्या या वक्तव्यावरून आता मिंधे गटातील आमदार भाजपवर नाराज झाले असून. त्यांच्या विरोधात आमदार तीव्र प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी “48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?” असा सवाल बावनकुळेंना विचारला आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “जागावाटपाचा निर्णय वरिष्ठांना घेऊद्यात. बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यात काही दम नाही. अतिउत्साहाच्या भरात बावनकुळेंकडून हे वक्तव्य झाले आहे. बावनकुळेंना जागावाटपाबाबत एवढे अधिकार कुणी दिले नाहीत. अशा वक्तव्यांमुळेच युतीमध्ये बेबनाव येतो, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी. 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? जागावाटपासंदर्भात वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. तुम्हाला यावर बोलण्याचा कोणी अधिकार दिला? या वक्तव्यांमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो.”
तर बावनकुळेंच्या वक्तव्यावर मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “आम्ही कमीत कमी 130 ते 140 जागा लढवणार आहोत. भाजप आमच्यापेक्षा मोठा पक्ष असल्याने निश्चितच भाजप जास्त जागा लढेल. पण आम्ही 125 पेक्षा कमी जागा लढणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी चंद्रशेखर बावनकुळे यांना समज द्यावी.”