मिंधे गटाच्या आडमुठेपणामुळे गणेशभक्तांमध्ये संताप; पोलीसही हतबल

एका मंडळातील गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेवरून मिंधे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या आडमुठेपणामुळे आज ‘श्रीं’ना पाच तास ताटकळत राहावे लागले. याबाबत गणेशभक्तांनी प्रचंड संताप व्यक्त केला, तर पोलीस प्रशासनही हतबल झाले. अखेर ‘श्रीं’ची विटंबना होऊ नये, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक आणि गणेशभक्तांनी त्याच चौकात स्वतंत्र मंडपात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.

ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाचे अधिकृत अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना डावलून आपल्या गटाच्या माजी अध्यक्षाला पुढे करून मिंधे गटाचे राजेश क्षीरसागर यांनी जबरदस्तीने मंडपात गणेशमूर्ती बसविली. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामार्फत पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मंडळाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी राहत कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा देत आज गणेशमूर्तीची वाजतगाजत त्याच मंडपात प्रतिष्ठापना करण्याचा इशारा दिला होता.

आज सकाळी 11च्या सुमारास सजविलेल्या पालखीतून ‘श्रीं’ची मूर्ती ऐतिहासिक बिंदू चौकातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघाली. मात्र, अवघ्या 15—20 फुटांवर पोलिसांनी पालखी रोखली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. शिवसेनेची गणेशमूर्ती असल्याच्या संकुचितपणातून त्या मंडपात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यास राजेश क्षीरसागर यांनी नकार देत आडमुठेपणाची भूमिका घेतली. दुसऱ्या ठिकाणी मंडप उबारून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा हट्ट क्षीरसागर यांनी धरला.

दरम्यान, ऐतिहासिक बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या अवघ्या 500 मीटर अंतरावर ‘श्रीं’ची मूर्ती घेऊन जाण्यास होणारा विलंब आणि पोलिसांवर आलेला ताण यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातच दुसऱ्या मंडपात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील गवळी, सेक्रेटरी प्रमोद नागवेकर आदी उपस्थित होते.

कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासमोर ‘श्रीं’चा ठिय्या

करवीरनगरीत ‘एक गाव-एक गणपती’ यासह निर्माल्यदान आणि नदी, तलावांऐवजी कृत्रिम कुंडांत मूर्तींचे विसर्जन करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी, तसेच डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत केली. कोल्हापुरातील ही चळवळ महाराष्ट्रात पसरली. आज ऐतिहासिक बिंदू चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे पालखीतून श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी निघाली होती; पण मिंधे गटाचे राजेश क्षीरसागर यांच्या आडमुठेपणामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासमोर तब्बल दोन तास श्री गणेशाच्या मूर्तीला ताटकळत राहावे लागले.