घटस्फोटासाठी कोर्टाने ठेवली अट, नवऱ्याला होणार 8 हजार वर्षांची कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात वितुष्ट आल्यास घटस्फोटाचा मार्ग मोकळा असतो. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जोडप्याला विभक्त होता येतं. पण, विविध देशांतील घटस्फोटासंबंधीचे कायदे वेगवेगळे असतात. अनेक देशांमध्ये असेही कायदे आहेत, ज्यांची कुणी कधी कल्पना केली नसेल. अशाच एका देशाच्या कायद्यामुळे घटस्फोट घेणारा नवरा कचाट्यात सापडला आहे.

घटस्फोटाची अट म्हणून एक ऑस्ट्रेलियन नागरिकाला इस्रायलच्या न्यायालयाने सुमारे 8 हजार वर्षांची कैद सुनावली आहे. या माणसाचं नाव नॉम हुपर्ट आहे. मूळचा ऑस्ट्रेलियाचा असणारा नॉम 2012मध्ये आपल्या दोन मुलांसह इस्रायलला राहायला आला होता. त्यावेळी त्याच्या बायकोने इस्रायल न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने त्याला 8 हजार वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. नॉम हा 31 डिसेंबर 9999 पर्यंत इस्रायल सोडू शकत नाही. जर त्याला या शिक्षेपासून वाचायचं असेल तर त्याला मुलांचा खर्च उचलावा लागेल.

हा खर्च तब्बल 3 मिलियन डॉलर म्हणजेच 47 कोटी रुपये इतका आहे. हे पैसे त्याच्या मुलांच्या भविष्यातील तरतुदींसाठी वापरले जाणार आहेत. नॉमने पैसे चुकते केले, तर त्याला इस्रायल सोडायची परवानगी मिळेल. अन्यथा, त्याला शिक्षा पूर्ण होईपर्यंत कैदेतच राहावं लागेल.