
हिंदुस्थानची स्टार युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत आणखी एक इतिहास रचला. उपांत्य फेरीतील दुसऱया डावात चीनच्या तन झोंगयी हिला पराभूत करत तिने फिडे कँडिडेट्स स्पर्धेतील प्रवेशही निश्चित केला.
दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दिव्याने शानदार खेळ करत झोंगयीवर 1.5-0.5 अशी आघाडी घेतली. मंगळवारी झालेला पहिला डाव अनिर्णीत राहिला होता. डावाच्या मध्यभागी झोंगयीकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत दिव्याने दोन प्यादींची आघाडी मिळवली आणि लगेच क्वीनची अदलाबदल केली. एक क्षणासाठी तिची स्थिती डळमळीत झाली, पण नंतर दिव्याने खेळावर पुन्हा पकड मिळवत विजयाकडे वाटचाल केली. अखेर दिव्या सुरक्षितपणे आघाडीवर गेल्यावर झोंगयीने पराभव मान्य केला. या विजयामुळे दिव्याने 2026 मध्ये होणार्या फिडे पँडिडेट्स स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. याचबरोबर ती या कामगिरीसह फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली हिंदुस्थानी ठरली आहे, हे विशेष.
हम्पीचा टायब्रेक सामना आज
दरम्यान, दुसऱ्या उपांत्य फेरीत हिंदुस्थानची कोनेरू हम्पी आणि चीनची लेई टिंगजी यांच्यात सलग दुसरा डावही बरोबरीत सुटला. या दोघींमधील टायब्रेक सामना गुरुवारी खेळवण्यात येणार आहे.