
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
एखादी स्त्री जेव्हा तिच्या आयुष्यातल्या नकारात्मक टप्प्याचा सामना करते तेव्हा न्यूनगंड, अपराधीपणाची जाणीव, एकटेपण आणि दुसऱयांच्या नजरेतील प्रश्नचिन्हे ह्या सगळ्यांशी एका वेळी लढत असते. या पायरीवर तिने शरीर आणि मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. समुपदेशनातून तिला अडथळ्यांची शर्यत पार करण्याचं बळ मिळते.
मॅम, आज माझ्या घटस्फोटाला पाच वर्षं झाली,’ समुपदेशन सत्राला बसतानाच अनुष्काने (नाव बदलले आहे) सांगितलं, तेसुद्धा केविलवाणं हसत. अनुष्का जसं तिच्या रोहनबद्दल म्हणजेच मुलाबद्दल बोलायला लागली तसा तिचा चेहरा बऱयापैकी तणावरहित झाला. अनुष्का जवळपास महिन्याभरापूर्वी आलेली होती. रोहन अभ्यासात टंगळमंगळ करत होता. स्वतच्या गोष्टी जागेवर न ठेवणं, उशिरापर्यंत झोपून राहणं, जेवताना टीव्ही आणि झोपेपर्यंत मोबाईल बघत राहणं ह्या अशा गोष्टींमुळे अनुष्का अतिशय त्रस्त झाली होती.
अनुष्का तिच्या माहेरी राहात होती. तिचे आईवडीलही आता थकले होते. विशेषत वडील कायम चिंतेत असत. त्यांना ह्या दोघांची विशेष काळजी असायची. त्या काळजीपोटी ते तिला आणि रोहनला कायम धारेवर धरायचे. रोहनला त्याच्या अभ्यासाबद्दल आणि अनुष्काला कायम तिच्या नवऱयापासून वेगळं होण्याच्या निर्णयाबद्दल. ह्या त्यांच्या वागण्यामुळे रोहन अजूनच चिडचिडा झाला होता. दुसरीकडे तिच्या नोकरीच्या ठिकाणी छोटय़ामोठय़ा कुरबुरी होत. रोहनच्या भवितव्याची चिंता तिला रात्रीची झोप लागू देत नव्हती. म्हणून तिने त्याच्या समुपदेशनासाठी अपॉइंटमेंट घेतली होती. त्यानुसार दोघंही नियमितपणे सत्राला येत होती.
रोहनही त्याला असलेल्या अडचणी, ताण आणि स्वतचे प्रश्न सत्रामध्ये येऊन मांडत होता आणि त्यानुसार स्वतमध्ये बदल घडवू पाहात होता. हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणाही होऊ लागली होती. पण एक दिवस अचानक तिचा फोन आला आणि तिने स्वतसाठी वेळ मागून घेतला. त्यानुसार ती समुपदेशनासाठी आली.
‘मॅम, आजकाल मला माझ्यामध्येही फरक जाणवायला लागला आहे. गेले काही दिवस माझा मूड अचानक जातोय, कारण नसताना कशाचं तरी दुःख होतंय, कुठेतरी एकटेपण आल्याची बोच राहते, उगाचच माझ्या वयाच्या इतर मैत्रिणींचे संसार बघून जेलसी वाटायला लागलीय. मला माहिती आहे की हे बरोबर नाही. पण… असं होतंय. हल्ली रोज मी कारण नसतानाही रोहनवर चिडते आणि मग मलाच वाईट वाटतं’. अनुष्काने एका दमात तिच्या सत्राला येण्याचं कारण सांगितलं.
अनुष्काच्या बोलण्यातून तिची चलबिचल जाणवत होती. तिचं वैशिष्टय़ म्हणजे तिचं टापटीप राहणीमान आणि शिस्त. तिच्या बोलण्यातून तिचं शिस्तीचं बालपण, आईवडिलांचे तिच्यावर झालेले संस्कार हे सगळं तिने मोठय़ा अभिमानाने सांगितलं. आणि ती रोहनच्या बाबतीतही हेच सर्व करत असल्याचं सुद्धा तिने सांगितलं. ‘पण मी रोहनला एकटीने वाढवतेय.’ अनुष्काच्या बोलण्यातून खंत डोकावली.
‘तुला सहचराची उणीव भासते आहे. खरं आहे का?’ ह्या वाक्यावर अनुष्का एकदम भांबावली आणि तिची मान खाली गेली. तिला पुन्हा ह्या प्रश्नावर छेडल्यावर तिने ‘हो’ असं उत्तर दिलं. ‘मग पुन्हा लग्नाचा विचार का नाही करत?’ असं पुढे विचारल्यावर तिने पटकन म्हटलं, ‘मला कुठेतरी गिल्ट आलंय.’ आणि अनुष्काने तिच्या मनातलं अपराधीपण बोलून दाखवलं.
अनुष्काचं घराणं हे कर्मठ विचारांचं होतं, ज्यामध्ये मुलींना बऱयाचशा गोष्टींची बंधनं होती. कडक संस्कारांमध्ये वाढलेल्या अनुष्काला त्याग आणि सोसण्याचं बाळकडू मिळालेलं होतं. पण काहीशा पुढारलेल्या तिने लग्न झाल्यावर तिच्यावर झालेल्या अन्यायाला न सोसता ते बंधन झुगारून दिलं आणि मुलाला, रोहनला घेऊन ती माहेरी आली. तिचं हे करणं तिच्या वडिलांना सुरुवातीला आवडलं नव्हतंच. पण मुलीच्या मायेखातर ते तिला त्यावेळी बोलले नाहीत. पण नंतर मात्र त्यांचे टोमणे, त्यांची काळजी आणि आईची वेगळी चिंता ह्यामुळे अनुष्का न्यूनगंडाच्या भावनेत जात चालली होती.
‘तुला घटस्फोटाचं शल्य आहे का?’ असं तिला विचारताच अनुष्का पटकन ‘नाही. अजिबात नाही’ असं उद्गारली. ‘मॅम, माझा नवरा माझा नव्हताच. आमचे लग्न झाल्याबरोबर खटके उडायचे. नंतर कळलं की त्याला लग्नाआधी एक मुलगी आवडली होती, पण त्यांचं लग्न होऊ नाही शकलं. त्याच्या आईचा विरोध होता. म्हणून तिने मला पसंत केलं आणि माझ्याशी त्याला लग्न करायला लावलं. पण त्याने तो राग नंतर काढला. त्या मुलीशी त्याने सबंध वाढवले आणि मला हे सहन करण्यासाठी सांगितलं. मला हे पटत नव्हतं. शेवटी मलाही स्वाभिमान होता. म्हणून मी घटस्फोट घेतला.’
बहुतेक वेळा जी मुलगी किंवा महिला तिच्या आयुष्यातल्या ह्या नकारात्मक टप्प्याचा सामना करते तेव्हा न्यूनगंड, अपराधीपणाची जाणीव, एकटेपण आणि दुसऱयांच्या नजरेतील प्रश्नचिन्हे ह्या सगळ्यांशी एका वेळी लढत असते. जर तिच्या पदरात मूल असेल तर ह्या नजरा सहानुभूतीदर्शक होतात. त्यामुळे अनुष्कासारख्या स्वाभिमानी स्त्रिया दुखावल्या जातात आणि मग आपण बिचारे नाही हे दाखवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत राहतात. पण शेवटी कुठेतरी शरीर आणि मनाची काळजी घेणं आवश्यक आहे.
अनुष्काला हेच ठसवलं गेलं की, ती कुठेच अपराधी नव्हती आणि तिचा निर्णय योग्य होता. तसंच, तिला दुसऱया लग्नाचा विचारही करायला हरकत नव्हती. पण ह्यावेळी अधिक सजगपणे पाऊले तिला उचलावी लागणार होती. तिच्या सहचराबद्दलच्या अपेक्षा, तिची सध्याची कर्तव्ये आणि भविष्यकाळातील योजना ह्याबद्दलही तिला बोलतं केलं गेलं. ज्यायोगे ती स्वत सगळ्याबाबतीत जागृत राहून ठोस पावले उचलू शकेल. ‘तू आईबाबांसाठी झेपेल तेवढं करते आहेसच. आता वयपरत्वे ते थकणारच. पण त्यांना तुझी चिंता ही असणारच. त्यासाठी तुला खंबीर राहायचं असेल तर स्वतबद्दल खात्री बाळग. मग आपोआप सगळं ठीक होणार.’ ह्या वाक्यांचा अनुष्कावर योग्य तो परिणाम झाला. ती दोघांशीही व्यवस्थित ह्याबद्दल बोलली. तेव्हा त्यांनी तिला स्पष्टच म्हटलं की त्यांना ती कधीच चुकीची वाटली नव्हती. मात्र ती पटकन दुसऱयावर विश्वास ठेवायची. त्यामुळेच तिने वैयक्तिक नुकसान आणि मनस्ताप सोसला होता. बाकी ह्यावर ती काम करणार असेल तर ते तिच्या पाठीशी खंबीर उभे राहणार होते. रोहनही त्यामध्ये सामील झाला आणि त्यानेही तिला हसतहसत पाठिंबा दिला.
आज अनुष्का खुश आणि मनमोकळी झाली आहे. तिने व्यवस्थित स्वतच्या आयुष्याची आखणी केली आहे, ज्यामध्ये तिला स्वतला वरचं स्थान तिने दिलेलं आहे.
[email protected]
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)