
संपूर्ण जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूला हरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दिव्यांगही या लढ्यात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. डाॅक्टर्स, नर्स, पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत मास्क पुरवठा करण्यासाठी आपापल्या परीने त्यांची धडपड सुरू आहे.
कोल्हापूर येथील ‘हेल्पर्स ऑफ दी हँडीक्राफ्ट’मध्ये शिक्षण घेणारे अनेक दिव्यांग विद्यार्थी लाॅकडाऊनमुळे आपापल्या गावी गेले आहेत. तर घरी जाणे शक्य न झालेले विद्यार्थी आणि परित्यक्ता असलेल्या काही प्रशिक्षणार्थी दिव्यांग महिला यांसह कर्मचारी वर्ग असे 65 जण या संस्थेत अजुनही आहेत. आजपर्यंत समाज आपल्या मदतीसाठी नेहमी पाठीशी उभा राहिला. आता या अशा संकट समयी समाजासाठी काहीतरी मदत करण्याच्या अत्यंत प्रामाणिक आणि प्रबळ भावनेतून व्हिल- चेअर्स बसूनच हे दिव्यांग पुढे सरसावले आहेत. कोरोना विरुद्धच्या या लढाईत मास्कचा तुटवडा तसेच चढ्या दराने होणारी विक्री पाहता, अनेक दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येऊन मदत करत आहेत. दिव्यांगांनीही कोरोनाशी लढणारे डॉक्टर्स, नर्स, पोलिस, आरोग्य कर्मचारी यांच्याकरिता मास्क बनविण्यासाठी ध्यास घेतला आहे. विद्यार्थ्यांसह परितक्त्या आणि प्रशिक्षणार्थी दिव्यांगांनी याच सामाजिक बांधिलकीतून तयार केलेले व पुनर्वापर करता येणारे पाचशेहून अधिक मास्क विनामोबदला वैद्यकीय अधिकारी, पोलीस दल, आरोग्य विभाग आणि महानगरपालिका कर्मचारी वर्ग यांच्याकडे सुपूर्द केले आहे. संस्थेचे विश्वस्त पी.डी.देशपांडे, मनोहर देशभ्रतार आणि मंजिरी करकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. संस्थेतील शिलाई मशिन युनिटचा यासाठी उपयोग करण्यात आला आहे. अजूनही मास्क बनविण्यात येत असल्याचे मंजिरी करकरे यांनी सांगितले.

























































