स्वागत दिवाळी अंकांचे

854

उल्हास प्रभात

‘उल्हास प्रभात’ या वृत्तपत्राचा 24 वा दीपावली विशेषांक प्रसिद्ध झाला असून या अंकात साईंचा महिमा-मोहन यादव यांची मुखपृष्ठ स्टोरी असून शिर्डीतील साईबाबांच्या माहितीचा यामध्ये समावेश आहे. त्याशिवाय सुरेश गोविंद देहेरकर, किरण लडकू गायकर, एकनाथ एकबोटे, भिकाजी सोनाजी भडांगे, चारुलता कुलकर्णी, सागर पडवळ, प्राची पवन सुर्वे, निकिता नरेश इंगावले, गुरुनाथ तिरपणकर यांचे लेख, कथा आहेत, तर उमेश गंगाधर पारसकर, सुभाष वरुडकर, शोभाकांत, सुनीता काटकर, आप्पाजी कोकीतकर, डॉ. श्रीकांत नरुले, शिवाजी बाबर, दा. र. दळवी, आनंद देशमुख यांच्या कवितांचा या अंकात समावेश आहे.

संपादक  :  गुरुनाथ पांडुरंग बनोटे

मूल्य : 100 रु., पृष्ठे :  128

दीपावली

‘दीपावली’चा हा नेहमीप्रमाणे साहित्यिक दिमाखाला साजेसा दिवाळी अंक. ज्येष्ठ चित्रकार रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त ‘माय वाईफ इन आर्ट’ या त्यांच्या पत्नीवरील अद्वितीय चित्रसंग्रहासह सुहास बहुळकर यांनी घेतलेला त्यांच्या चित्रसाधनेचा वेद हे अंकाचे प्रमुख वैशिष्टय़. त्याशिवाय हृषीकेश गुप्ते यांची दीर्घकथा, विवेक गोविलकर, नीरजा, गणेश मतकरी, नीलिमा बोरवणकर इ.च्या कथा, अनिल अवचट, डॉ. बाळ फोंडके, मिलिंद बोकील, नंदिनी आत्मसिद्ध, अंजली कीर्तने आदींचे ललित लेखन वाचकांना खूप समाधान देणारे आहे. ‘अस्मितेचा रंग आणि बेरंग’ या ताज्या विषयावरील लेखमालेत न्या. नरेंद्र चपळगावकर, निळू दामले, हेमंत देसाई इत्यादींचे लेख उद्बोधक आहेत. संयोजन अंबरीश मिश्र यांचे आहे. देखणे मुखपृष्ठ, आकर्षक सजावट आणि सकस साहित्यामुळे अंक वाचनीय झाला आहे.

संपादक : अशोक कोठावळे

मूल्य : 200 रु,. पृष्ठे :  252

 

माझी सहेली

महिलांसाठी वैविध्यपूर्ण विषयांची रेलचेल असलेला दिवाळी अंक म्हणजे माझी सहेली.  दिवाळीची सुरुवात अभ्यंगस्नानाने होते. अंकाची सुरुवात चिरतारुण्यासाठी ‘अभ्यंगस्नान’ या लेखाने केली आहे. त्याचबरोबर ‘मिणमिणती मुंबापुरी आणि लखलखती मुंबई’, ‘मी टू’पणाची झाली बोळवण, स्वर्गातल्या शापित अप्सरा, जलकन्या, एक गाव आठवणीतलं, तीन धर्मांचा त्रिवेणी संगम हे विशेष लेख वाचनीय आणि माहितीपूर्ण आहेत. द्रौपदीची थाळी विभागातील ‘वाढवा दिवाळीचा गोडवा’ यातील पदार्थ लज्जतदार असून गृहिणींसाठी उपयुक्त आहेत.

संपादक : हेमा मालिनी

मूल्य : 60 रु., पृष्ठे :  210

 

गंधाली

‘गंधाली’ दिवाळी अंकात मान्यवर लेखकांचे दर्जेदार साहित्य आहे. गिरिजा कीर, वसंत वाहोकार, प्रा.प्रतिभा सराफ, नारायण लाळे, रमाकांत देशपांडे, राजेंद्र वैद्य, अशोक लोटणकर, श्रीधर दीक्षित, मनीष पाटील या मान्यवरांच्या कथांनी यंदाचा दिवाळी अंक अधिक बहरला आहे. अंकातील ललित विभागातील डॉ.विजय ढवळे यांचा  लेख अभ्यासपूर्ण आहे, तर डॉ. अलका कुलकर्णी यांचा कादंबरी विभागातील लेख अत्यंत वाचनीय आहे. लेख विभागातील प्राचार्य पु.द.कोडोलीकर, डॉ.वसंत केळकर, डॉ.मधुकर वर्तक, अनघा तांबोळी, मनोज आचार्य, वर्षा रेगे यांचे लेख माहितीपूर्ण आहेत. जीवन तळेगावकर यांनी केलेले ‘निसर्ग, माणूस आणि मनाली’ हे प्रवासवर्णन अफलातून असून मनालीची सैर करून आणणारे आहे.

संपादक : डॉ.मधुकर वर्तक

किंमत : 200 रु., पृष्ठे :  220

 

अक्षर

स्त्रियांवर लैंगिक आक्रमण करणार्‍या पुरुषांविरोधात ‘मी टू’ मोहिमेचा वेध घेण्याचा प्रयत्न या अंकात केला आहे. यात वंदना खरे, सारा वारीस, चिन्मयी सुमित, हिमांशू शर्मा आदींनी याविषयी लिखाण केले आहे. मनपाच्या लैंगिक छळाविरुद्धच्या मुख्य तक्रार सचिव असलेल्या कामाक्षी भाटे यांची मुलाखतही महत्त्वाची ठरली आहे. याशिवाय नेटफ्लिक्सचं साम्राज्य (मीना कर्णिक), न्यूड स्टडी (सुप्रिया विनोद), विज्ञानाचं बिनरहस्य (हेमंत कर्णिक), त्यांचा असामान्य प्रवास (दीप्ती राऊत), पहिला फॅसिस्ट (हेमंत देसाई) दर्जेदार आहेत. हृषीकेश गुप्ते, सतीश तांबे यांच्या दीर्घकथा आणि शिल्पा कांबळे, इरावती कर्णिक आदींच्या कथाही उत्तम जमून आल्यात. उत्तम छपाई व वेधक मांडणी या जमेच्या बाजू. संग्रही ठेवावा असा अंक.

संपादक : मीना कर्णिक, हेमंत कर्णिक

मूल्य : 200 रु., पृष्ठे :  242

 

दर्यावर्दी

सागरी जीवनाला वाहिलेला हा दिवाळी अंक आहे. या अंकात ऑसिडयुक्त महासागर (डॉ. कुलकर्णी), मिठबाव खाडीतील खारफुटी व जारा (प्रा. डॉ. सूर्यकांत येरागी व मेजर डॉ. सुप्रिया येरागी), देवगड पर्यटन (पांडुरंग भाबल), सिंधुदुर्गची सफर (अरविंद कामत) हे लेख माहितीपूर्ण आहेत. याशिवाय पंढरीनाथ तामोरे, गीता ग्रामोपाध्ये, सुधीर पाटील, नवनाथ तांडेल यांच्या कथा उत्तम आहेत. वाढते वृद्धाश्रम या सामाजिक शोकांतिकेवर जयंत पावशे यांनी केलेले भाष्य नवीन पिढीच्या डोळय़ांत अंजन घालणारे आहे. औषधे – समज आणि गैरसमज (शं. रा. पेंडसे), कासव पुराण (श्री. श्री. देसाई), कीर्तनाचा वसा (डॉ. अनुपमा कांदळगावकर), मालवणची खाद्य संस्कृती (शुभदा पेडणेकर), चंदेरी दुनियेतील सुपरस्टार (समता गंधे) या लेखांचा समावेश या अंकात केला आहे. 

संपादक : अमोल सरतांडेल

मूल्य : 80 रु., पृष्ठे :  136

 

किशोर

या अंकात बालचमूसाठीच्या कथा, कविता आहेत. उमलत्या नवीन पिढीवर सर्जनशीलता, संस्कार आणि मूल्यांची पेरणी करण्याचे काम बालभारती गेली 47 वर्षांपासून किशोरच्या माध्यमातून करीत आहे. संस्कारक्षम, विचारप्रवर्तक, विनोदी आणि बुद्धीला चालना देणारे साहित्य यात समाविष्ट केले आहे. नितीन देशमुख यांची ‘कारुण्याच्या वाती’ ही कवीता लहानग्यांबरोबरच मोठय़ांनाही सुन्न करून सोडते. राजा शिरगुप्पे यांची ‘पर्यावरणवादी’ चिक्या’ची गोष्ट लानग्यांना निसर्गांच्या सानिध्यात घेऊन जाते. यासह अन्य कथा कवितादेखील वाचनीय आहेत. आकर्षक छपाई असलेल्या या अंकात कथा, कवितांचा समावेश आहे. हा अंक बालचमुंच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

संपादक : डॉ. सुनील मगर

मूल्य : 60रु., पृष्ठ : 132

आपली प्रतिक्रिया द्या