
दिवाळी अंकाच्या शतकाहून अधिक समृद्ध परंपरेत यंदा भर पडलेय ती ’बोलका दिवाळी अंक’ची. दिवाळीची मजा साहित्याच्या फराळाशिवाय अधुरी आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा एक पाऊल पुढे टाकत ऑनलाईन अंक आणि त्याही पुढे जात बोलका दिवाळी अंक ही संकल्पना यावर्षी रुजताना दिसत आहे. खास बच्चेकंपनीसाठी बोलणारे अंक यंदा उपलब्ध झाले आहेत. सध्या अशा अंकांची संख्या खूप मर्यादित असली तरी येत्या काही वर्षांत हा नवा ट्रेंड प्रस्थापित होऊ शकतो.
इंटरनेट, डिजिटलच्या जमान्याशी सुसंगत अशी ही ’बोलका दिवाळी अंक’शी संकल्पना आहे. मुलांसाठी, त्यातही खास करून ग्रामीण भागातील मुलांसाठी ती खूपच चांगली आहे. जिथे इंटरनेटची रेंज नाही किंवा ज्या घरांमध्ये स्मार्टपह्न नाही, अशी मुले साध्या पह्नवरून अंकाचा आनंद घेता येऊ शकतात. अशा पद्धतीने ऐकता येईल, बघता येईल, असा दिवाळी अंक ज्ञानप्रबोधिनी, छात्र प्रबोधन या संस्थेने उपलब्ध करून दिला आहे. याव्यतिरिक्त ज्योती कपिले संचालित ’ज्योत’ संस्थेने युट्यूबच्या माध्यमातून बोलणाऱया दिवाळी अंकाची भेट मुलांना दिली आहे. ज्योत या ई मासिकाचा खास बच्चेकंपनीसाठी बोलका व्हिडियो दिवाळी विशेषांक 13 नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशित होत आहे.
’ज्योत’मध्ये काय ऐकाल आणि बघाल?
’ज्योत’ या बोलका अंकाचे संपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले आहे. एकनाथ आव्हाड यांच्यासह डॉ. विजया वाड, माधवी पुंटे, डॉ. सुरेश सावंत आदी मातब्बर बालसाहित्यिक यामध्ये सहभागी आहेत. युटयूब चॅनेलवर हा अंक उद्यापासून उपलब्ध असेल. कथा, कविता, कोडी, प्रश्नमंजुषा असे त्याचे स्वरूप आहे अशी माहिती ‘ज्योत’चे संपादक एकनाथ आव्हाड यांनी दिली.
ग्रामीण भागातील मुलांना पर्वणी
ग्रामीण, दुर्गम वाडय़ा-वस्त्यांमधील मुलांसाठी ज्ञान प्रबोधिनी, छात्र प्रबोधिनीने ‘बोलका दिवाळी अंक’ ही संकल्पना 5 नोव्हेंबरपासून अमलात आणली आहे. अंकाचा आनंद घेण्यासाठी 9667715716 या क्रमांकावर फक्त पह्न करावा लागेल. नाव, गाव, तालुका आणि वय सांगून फक्त एकदाच नोंदणी करायची आहे. त्यानंतर पुढील महिनाभर मुलांना कधीही मोफत ऐकता येईल. पह्नवरील 1 ते 9 क्रमांकावर गोष्टी गाणी, जिद्दीच्या कहाण्या, विशेष लेख, कलाकृती, विज्ञान प्रयोग अशा 10 साहित्य प्रकारांचा संच आहे. दर पाच दिवसांनी हा संच बदलणार आहे अशी माहिती ज्ञानप्रबोधिनी-छात्र प्रबोधनींचे संपादक महेंद्र सेठीया यांनी दिली.

































































