
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ शिवसेना व युवासेना आयोजित दिपावली महोत्सव 2018 चा शानदार उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, महिला आघाडी कुडाळ आणि शिवसेना नगरसेवक कुडाळ यांच्यावतीने महिला सक्षमीकरण व शाश्वत रोजगार देण्यासाठी दिपावली महोत्सव 2018 चे आयोजन कुडाळ शिवसेना शाखा येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत व संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आले तर कै. प्रकाश परब व्यासपीठाचे उद्घाटन माजी महापौर तथा रायगडचे संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक, सावंतवाडी संपर्कप्रमुख विक्रांत सावंत, जि.प.सदस्य संजय पडते, गटनेते नागेंद्र परब, अमरसेन सावंत, सभापती राजन जाधव, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, मालवण तालुका प्रमुख हरि खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आदींसह जिल्हातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले की, युवासेना व महिला आघाडीने हा सामाजिक उपक्रम राबविला हे कौतुकास्पद आहे. याही पुढे असेच विविध उपक्रम हाती घ्यावेत. महिला बचत गटांना अशा उपक्रमांतुन प्रोत्साहन द्यावे. संपर्कप्रमुख दुधवडकर व आमदार नाईक यांनीही हा उपक्रम स्तुत्य असून पुढील वर्षापासून मोठ्या स्वरूपात हा महोत्सव घ्यावा असे सांगत उपक्रमाचे कौतुक केले.
महिला आघाडीप्रमुख सावंत यांनी महोत्सव आयोजना मागील संकल्पना विशद केली. मंदार शिरसाट व सहकार्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रायगड जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल दत्ता दळवी यांचा तर यशवंत पंचायत राज अभियानात कुडाळ पं.स.ने अव्वल स्थान मिळविल्याबद्दल सभापती राजन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान नेरूर येथील महिला ढोलपथकाने आपली कला सादर केली. कै. प्रकाश परब यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
5 नोव्हेबर 2018 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत चालणार्या या महोत्सवांतर्गत कारेटीपासुन करंजीपर्यंत दिवाळीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत.





























































