
दसरा, दिवाळीसारखे मोठे सण असतानाही ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवाकरातून (जीएसटी) मिळणाऱया महसुलात मोठी घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये सरकारला 95,380 कोटी रुपये मिळाले. गेल्या वर्षी याच काळात 1,00,710 कोटी सरकारी तिजोरीत जमा झाले होते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये 5.29 टक्क्यांची ही घट आहे.
आर्थिक मंदीचा फटका सर्व उद्योग क्षेत्रांना बसत आहे. दिवाळीच्या काळातही बाजारपेठांमध्ये मंदीचा फटका व्यापाऱयांना बसला. विशेष म्हणजे सलग तिसऱया महिन्यात ‘जीएसटी’मधून सरकारला मिळणाऱया महसुलामध्ये घट होत आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारी तिजोरीत 91,916 कोटींचे उत्पन्न जीएसटीतून मिळाले होते. ऑक्टोबरमध्ये 95,380 कोटींचा महसूल मिळाला आहे असे केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

























































