दिवाळी नावाचा नॉस्टॅल्जिया

2777

>> जुई कुलकर्णी 

दिवाळी म्हटली की, मन अलगद लहानपणीच्या आठवणींमध्ये आपोआप रममाण होतं. दिवाळीच्या नावानेच मनाला आनंदाची आणि उत्साहाची भरारी येते. लहानपणी दिवाळीत केलेली मजा म्हणजे आयुष्यभराचा खजिना असतो. दिवाळीची सुट्टी, त्या सुट्टीला असलेली निवांततेची लय. अगदी मोकळी ढाकळी, फराळी सुगंधाची, हवं तसं उनाडू देणारी आणि या सुट्टीतलं वाचनवेड, दिवाळी अंक, मुलांनी तयार केलेला किल्ला… असं बरंच काही… आठवणीं जागं करणारं… 

अजूनही दिवाळी म्हणलं की, सहामाही परीक्षेचा तो खवीस गणिताचा पेपर आठवतो. शेवटी दबा धरून बसलेला, वाकुल्या दाखवत असलेला तो पेपर. तो पेपर संपायचा आणि मी हताश पराभूत जखमी योद्धागत आमच्या महान (तेव्हा प्रचंड वाटणाऱ्या) शाळेच्या दगडी पायऱ्या उतरून खाली यायचे. बाहेर आजोबा वाट बघत असायचे. ते माझी गणित-अपयश जाणून असतं आणि त्याचंही त्यांना कौतुक असे. त्या गणित लढाईवर उतारा म्हणून शाळेतल्या ढीगभर झाडांपैकी एका झाडाखाली ‘आनंद’ दिवाळी अंकाचा एक स्टॉल लागलेला असे. तिथे तो अंक मिळे.

हा फक्त माझा अंक असे. समवयस्क वाचनवेडे भाऊबहीण किंवा मित्रमैत्रीण नसल्याने बुक पझेसिवनेस तिथूनच अंगी शिरला असावा.

मग दौंडला गेलं की आज्जी चंपक, ठकठक, किशोर घेऊन द्यायची. हे अंक मात्र मावसभाऊ आणि मी मिळून वाचत असू. कधी या मावसभावाला बैतुलचे नातेवाईक चाचा चौधरी पाठवत. तो तर खजिना वाटे. आजोबा फटाक्यांसाठी द्यायचे ते शंभर रुपये फारच जास्ती होत. मी त्यातील पैसे वाचवून दुसऱया खरेदीला वापरायची सवय लौकरच लावून घेतली. मग एका दिवाळी सुट्टीत मी पुण्यात एक रद्दीचं दुकान शोधलं जिथे चाचा चौधरी आणि फँटम कॉमिक्स चार आण्याला मिळत. पीटर पॅन आणि तत्सम फिरंगी फेअरिटेल्सचीही पुस्तक मिळत. पाच रुपयांमध्ये भरपूर मज्जा येई. नंतर फास्टर फेणेचा अख्खा सेट घेतलेला.

दिवाळी अंक म्हणजे दिवाळीचा असा अपरिहार्य भाग. फराळ, नवे कपडे, फटाके, किल्ला, आकाशकंदील, रांगोळी, आलमंड ड्रॉप बदाम तेल, मोती साबण आणि दिवाळी अंक. एक समयावच्छेद करून म्हणतात तसं की काय ते! आजोबांमुळे लायब्ररीतून आलेले दिवाळी अंक फार लहानपणापासून वाचले. मौज, हंस, माहेर, मेनका वगैरे रोचक नावांच्या लोकांसोबत आवाज, जत्रा पण येई. त्यातल्या खिडक्या बघायला खूप गंमत येई. लहान मुलांना बंदी असणारी ही चावट मासिकं चोरून बघायला मजा येत असे. दुसरे मोठ्ठे लोक्स दडपशाही करत असले तरी आजोबांच्या मते, ‘‘बघू दे, काही हरकत नाही’’ असं असल्याने हे अंक बघायला मिळत असत. कदाचित त्यामुळे तिकडचा ओढा पटकन आटला आणि आपल्याला वाचायला काय आवडतं याची निवड पटकन करता आली. अजूनही मी लायब्ररीत गेले की आवाज, जत्राच्या खिडक्या फक्त बघून घेते. अनेक मोठे लेखक आधी मी दिवाळी अंकातून वाचले.

एका टप्प्यावर आयुष्यात विस्कटल्यासारखं भलतंच शिक्षण घेऊन बसले होते तेव्हा आजोबांचं वाक्य आठवायचं. ‘‘तू कला क्षेत्रातच काहीतरी करशील’’. त्याकाळी खरंतर कुठेही काही (दिवाळी अंकातून तर लांबच) लिहू वगैरे शकेन असं डोक्यातही नव्हतं. आज ते असते तर त्यांना फार भारी वाटलं असतं.

दिवाळी म्हणलं की किल्ला नावाचा आठवण मळा जागा होतो. कारण, किल्ला म्हणलं की, आठवणींचा मळा जागा होतो. किल्ला ही खरी वाडय़ातच करायची गोष्ट. कारण त्याला लागणारी मोकळी जागा म्हणजे अंगण आणि मुलामुलींचा निवांत मोकळा ग्रुप तिथे असे. मोकळा याअर्थी की, पूर्वी सुट्टीमध्ये कसलेही संस्कार वर्ग, क्लासेस या छळीक भानगडी नसत. आयुष्याची लयच निवांत होती. एकदा सुट्टी लागली की खरंच सुट्टी असे. अगदी मोकळी ढाकळी, फराळी सुगंधाची, हवं तसं उनाडू देणारी सुट्टी. तर दिवाळीची सुट्टी आणि किल्ला हे समीकरण ठरलेलं. बाकी शहरांचं माहीत नाही, पण निदान पुण्यात तरी हीच पद्धत होती. शिवाजी महाराजांचं आणि पेशवाईचं गाव असल्यामुळे कदाचित पडली असावी. कारण अगदी माझे आजोबाही त्यांच्या लहानपणीच्या किल्ला करण्याच्या आठवणी सांगत असत.

दिवाळीची सुट्टी लागली की, विटा जमवायला लागायचं. एखादं जुनं पोतं. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माती. त्यावेळी नदीकिनारी सिमेंटचा रस्ता नसल्याने तिथे माती मिळायची. माती आणायला जाताना वाडय़ातले सगळे टिल्ले पिल्ले आणि आमची वाडय़ातली ताई सोबत असे.

विटा रचायच्या. पोतं ओलं करून पांघरायचं. माती ओली करून लिंपून काढायची. किल्ला तयार करण्याचा राडा हाच विशेष आनंदाचा भाग असे. त्यावेळी त्या चिखलात खेळण्याचा आनंद, धमाल अजूनही लक्षात आहे. किल्ल्याचा पायथा आणि कळस निटच ठरवायचा. एक गुप्त रस्ता वगैरे, पण हल्ला झाला तर पळायला वगैरे. मग मातीची चित्रं आणायची. घरून पैसे घेऊन मंडईमध्ये जायचं. आजोबा दरवर्षी फटाके आणि मातीची चित्रं यासाठी शंभर रुपये देत. केवढे वाटत ते पैसे आणि त्यात यायचंही खूप काय काय.

या खरेदीत शिवाजी महाराज सर्वात महत्त्वाचे असत. बसलेले किंवा उभे. मावळे, वाघ, हत्ती, घोडे, सिंह. नऊवारी नेसलेल्या ठसठशीत बायका. घरं, गाई वगैरे. मी आणि माझा शेजारचा मित्र मिळून आमचा किल्ला असायचा. त्यामुळे दोन दोन शिवाजी महाराज असत. एक वर सिंहासनावर एक खाली पाहणी करत असलेले खाली. ते आता आठवलं की, फार हसू येतं, पण तेव्हा कुणी हसत नसे. निदान हसलेलं आठवत तरी नाही. फँटसी जपायच्या वयात ती जपली जात असे. आईस्क्रीमचा एक रिकामा कप जपून ठेवलेला असे (त्याकाळी प्लॅस्टिक ग्लासची फार पद्धत नसे ) तो लिंपून त्याची विहीर करायची शेजारी पाणी भरणारी बाई हवीच.

किल्ल्यामध्ये मधेच भावाचा रणगाडा, विमान, आजच्या काळातला सैनिक असल्या भलत्या वस्तूही येऊन बसत असत. त्याचं काही वाटत नसे. किल्ल्यामध्ये माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हळीव किंवा मोहरी पेरणे. रोज जाऊन किती उगवलंय ते बघणे. ते भलतंच मस्त काम असे आणि ते फक्त मीच करत असे. त्या शेतात कम जंगलात झाडून असतील ते सगळेच प्राणीशेजारीच ठेवलेले असत हा अजून एक मजेशीर प्रकार. गाय आणि वाघ, घोडा आणि हत्ती, सिंह आणि हरीण असे सगळे एकत्रच बसलेले असत हे आता विनोदी वाटतं. वाडय़ात ऐसपैस असलेला किल्ला नंतर ब्लॉकमध्ये गेल्यावर आकसून गेला, पण मजा राहिली. नंतर त्यात लहान भावाचे जी आय जो सैनिक आणि गाडय़ापण येऊन बसले.

आक्रसून अख्ख्या मजल्याचा एकच किल्ला झाला. इथे मीच ताई असल्याने किल्ल्याच्या बाबतीत भरपूर ताईगिरी केली. वय वाढत गेलं तसा आपसूक किल्ल्याचा आनंद माझ्यापुरता आक्रसत गेला आणि गायब झाला. काही काळ भाऊ आणि इतर लहान मुलं करत राहिले. ते मोठे झाले तसे त्यांचा किल्लाही बंद झाला.

काही मोठी मुलं म्हणे दिवाळी संपली, किल्ला सुना झाला की उरलेले फटाके किल्ल्याच्या आत उडवून किल्ला उद्ध्वस्त करत. हे असलं काही करण्यात मुलांचाच हातभार असे. कुठली मुलगी असं करताना मी तरी पाहिली नाही. संभाजी बागेत किल्ल्याच्या स्पर्धा होत. अजूनही होत असतील. त्या बघायला गेलं की, आपला छोटासा किल्ला फारच कसनुसा वाटे. पण तरीही तोच बेस्ट असायचा, कारण स्वतःच्या हाताने एक नवीन जग तयार करण्याचा तो अनुभव असे. सगळे सण बहुतेक लहानपणासोबत संपतात. मग उरतो फक्त खरेदीचा उन्माद आणि ओढायची नाइलाजयुक्त रिचुअलने भरलेली ओझी. आता तर दिवाळी उगाचच भयंकर चकचकीत वाटते. तरीही खेळायचीच असते दिवाळी दिवाळी कारण त्यात अजून तरी निदान दिवाळी अंक तरी आहेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या