
सामना ऑनलाईन । चैन्नई
करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी मानले जाणाऱ्या एम. के. स्टॅलिन यांच्यासमोर त्यांच्या मोठ्या भावाने अलागिरीने आव्हान उभे केले आहे. त्यामुळे करुणानिधी यांच्या उत्तराधिकाऱ्यांमधील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. अलागिरी यांना चार वर्षापूर्वी पक्षातून निष्कासित करण्यात आले होते. मात्र, करुणानिधी यांच्या निधनानंतर सहा दिवसांनीच त्यांनी उत्तराधिकारी पदासाठी दावा केला आहे.माझ्या वडिलांवर निष्ठा ठेवणारे पक्षातीव सर्व नेते आणि कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.तामिळनाडूतील जनता आणि द्रमुकमधील मोठा गट आपल्या बाजूने आहे. सध्या जे सुरू आहे, त्याबाबत मला दुःख होत आहे. मात्र, या परिस्थितीत येणारा काळच पक्षाची आणि आपली पुढील वाटचाल ठरवणार आहे.
करुणानिधी यांची पत्नी दयालु यांची अलागिरी आणि स्टॅलीन ही दोन मुले आहेत. पक्षाच्या कार्यकारी समितीची मंगळवारी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम.के. स्टॅलीन यांना अध्यक्षपद देण्याबाबत चर्चा होणार आहे. पक्षाच्या सर्व नेत्यांना या बैठकीत सहभागी होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जात आहे. करुणानिधी यांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
करुणानिधी यांनी मार्च २०१४ मध्ये अलागिरी यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपवरून आणि वरिष्ठ नेत्यांविरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांना पक्षातून निष्कासित केले होते.
त्यावेळी करुणानिधी स्टॅलीन आणि आपल्यामध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप आलागिरी यांनी केला होता. करुणानिधी यांनी स्टॅलीन यांना २०१४ मध्ये उत्तराधिकारी घोषित केले होते. तसेच जानेवरी २०१७ मध्ये त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते.
अलागिरी यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही
अलागिरी यांनी स्टॅलीन यांना आव्हान दिल्यानंतर पक्ष स्टॅलीन यांच्या पाठिशी असल्याचे दिसत आहे. स्टॅलीन यांच्यावर टीका करण्याचा किंवा करुणानिधी यांच्यानंतर उत्तराधिकारी पदावर दावा करण्याचा अलागिरी यांना कोणताही अधिकार नाही कारण ते पक्षातच नाहीत. त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही. तसेच करुणानिधी यांनीच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची आधीच निवड केली आहे असे पक्षाचे महासचिव के. अनबालगन यांनी म्हटले आहे.

























































