दक्षिणेत प्रादेशिक पक्षांचाच दबदबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण हिंदुस्थानात प्रादेशिक पक्षांचाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, राष्ट्रीय पक्षांना नाकारले आहे. तामिळनाडूत अपेक्षेप्रमाणे द्रमुक आघाडीची सत्ता आली आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री असतील.

तामिळनाडूत अनेक दशकांपासून अण्णाद्रमुक किंवा द्रमुक या दोन पक्षांचीच आलटून पालटून सत्ता आहे. या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्टय़े म्हणजे माजी मुख्यमंत्री जयललिता आणि एम. करुणानिधी हे दोघे दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक होती. येथे करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक आघाडी स्थापन झाली.

या आघाडीत द्रमुकसह काँग्रेस आणि भाकप आहेत. तर मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक आघाडी आहे. यात अण्णाद्रमुकसह भाजप आणि पीएमके यांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांचा ‘एमएनएम’ पक्षही निवडणूक रिंगणात होता. मात्र, त्यांच्या पक्षाला फार यश मिळाले नाही.

द्रमुक आघाडीला 154 जागा

तामिळनाडू विधानसभेच्या 243 जागांपैकी द्रमुक आघाडीला 154 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 124 जागांची गरज आहे. बहुमतापेक्षा 26 जागा द्रमुक आघाडीकडे जास्त आहेत. यात द्रमुकला 134, काँग्रेस पक्षाला 18 आणि भाकपला 2 जागा मिळाल्या.
अण्णाद्रमुक आघाडीला 76 जागांवर समाधान मानावे लागले. यामध्ये अण्णाद्रमुकला 69, पीएमकेला 5 आणि भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्या.

कमल हसन पराभूत

ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांचा एमएनएम हा पक्ष निवडणूक रिंगणात उतरला होता. अटीतटीच्या लढतीत त्यांचा 1500 मतांनी पराभव झाला. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन या विजयी झाल्या आहेत.