मृत खलाशाची ओळख पटण्यासाठी डीएनए चाचणी करा, हायकोर्टाचे नौकानयन महासंचालनालयाला आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओमानच्या समुद्रात जहाजावर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला हिंदुस्थानी खलाशी दीक्षित सोलंकी याची ओळख पटावी यासाठी पार्थिवाची डीएनए चाचणी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने नौकानयन महासंचालनालयाला दिले. संबंधित पार्थिवाचे अवशेष तातडीने मुंबईतील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवून डीएनए तपासणीचा अहवाल तयार करण्याचेही हायकोर्टाने यावेळी स्पष्ट केले.

4 मार्च रोजी स्फोटकांनी भरलेला ड्रोन ओमानच्या समुद्रातील ‘एमटी एमकेडी व्योम’ या तेलवाहू जहाजावर पडला. या हल्ल्यात बोटीवर खलाशी असलेला 25 वर्षीय दीक्षित सोलंकी ठार झाला. महिना उलटूनही त्याचे पार्थिव ताब्यात न मिळाल्याने दीक्षितचे वडील अमृतलाल आणि बहीण मिताली यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर व अॅड. माधवी अय्यपन यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. केंद्र सरकार व नौकानयन महासंचालनालयच्या वतीने ज्येष्ठ वकील रुई रॉड्रिग्ज यांनी न्यायालयात माहिती दिली की, यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि हैदराबाद व मुंबईतील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेशी अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार या मृतदेहाची डीएनए चाचणी केली जाईल. दरम्यान, कुटुंबीयांच्या वकिलांनी डीएनए अहवालासाठी निश्चित कालमर्यादा ठरवण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने अशा प्रकारची वेळमर्यादा ठरवण्यास नकार दिला. खंडपीठाने डीएनए चाचणीच्या आदेशानंतर त्याबाबतच्या अहवालाची प्रत कुटुंबीयांना देण्याचे स्पष्ट करत प्रकरण निकाली काढले.