ज्ञानेश्वर माऊली’ ने गाठला 500 भागांचा टप्पा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेडय़ामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे.

मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत आहे. आळंदीच्या ग्रामस्थांना माउलींच्या दिव्यत्वाचे दर्शन वेळोवेळी होते आहे. माऊली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार ग्रामस्थांना पाहायला मिळाले. नुकतीच मालिकेत माऊली आणि त्यांची भावंडं यांच्याबरोबर संत सेना महाराज यांची भेट झाली. आत्तापर्यंत अनेक संत आणि त्यांची मांदियाळी ‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेतून पाहायला मिळाली असून मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेने 500 भागांचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने रविवारी महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर दाखवण्यात आला.