छत्रपती शिवाजी महाराजांना जात लावू नका ते विश्वपुरुष होते, संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावले

छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असे विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांचा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा हा फार मोठा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत आहेत. अनेक युगपुरुष भारतीय जनता पक्षाने पळवायचा प्रयत्न केला. जसे नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर यांना पळवायचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही. आता भाजप छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवायचा प्रयत्न करत आहेत. पण, याच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती, पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती हे विसरू नका, असा हल्लाबोल राऊतांनी केला.

याच मुद्द्यावर अधिक बोलताना, राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते विश्वपुरुष होते. त्याआधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा. पाटीदार होते वगैरे हा विषय आता काढण्याची गरज काय? हे असे विषय काढून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार सुरु आहे. सर्वात आधी महाराष्ट्रातील कारखाने पळवले, जमिनी पळवल्या, शिवसेना पळवली, राष्ट्रवादी काँग्रेस पळवली, अधूनमधून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमाचा उमाळा येत असतो. उद्या बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा पळवाल. आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले आहेत. हे निर्लज्ज लोक आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुम्ही पळवत आहात. तुमच्याकडे काही दैवत नाही का? गुजरातमध्ये सगळे राक्षस, बकासुर आहेत का? तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्मालाच आलेले नाहीत का? म्हणून तुम्हाला आमची दैवतं पळवण्याचा बकासुरी आनंद घ्यायचा आहे का? असा टोला लगावला.

संयुक्त मुलाखतीसंदर्भात

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेआधी होणाऱ्या मुलाखतीवर देखील संजय राऊत यांनी प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, दोन नेते दोन भाऊ एकत्र येताहेत.. आम्ही असं ठरवलं आहे की, या मुलाखतीच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी. आपण महाराष्ट्राला आणि मुंबईला काय देणार आहोत, या संदर्भात चर्चा होणार आहे. महेश मांजरेकर हे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते असले तरी ते एक मुंबईकर म्हणून मुलाखत घेण्यासाठी बसणार आहेत. ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे.

शिवसेना आणि मनसे युतीची सभा कधी घ्यायची याची मांडणी आम्ही केली आहे. परंतु शिवसेना मनसेला सभा घेता येऊ नये या राक्षसी हेतूने मैदानावर दगड ठेवले आहेत असे म्हणत राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले.

रविंद्र चव्हाणांनी केलेल्या विलासराव देशमुख यांच्या वक्तव्यावरही संजय राऊत यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरु यांच्या आठवणी भारतीय जनता पक्षाला पुसायच्या आहेत. शिवसेना तोडून विकत घेऊन बाळासाहेबांच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना काय ठेवायचं आहे तर आयत्या बिळावर मारलेल्या रेघाोट्या.. , शरद पवार यांचं कार्यही पुसायचं आहे असे म्हणत राऊतांनी चव्हाणांना खडे बोल सुनावले.