केडीएमसी हद्दीत राहतो की उल्हासनगर? उल्हासनगर परिवहनच्या थांब्यामुळे टिटवाळावासी भिरभिरले

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील टिटवाळा परिसरात उल्हासनगर पालिकेने आपली परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध मार्गावर बसथांबे सुरू करून फलक लावले आहेत. उल्हासनगर पालिकेच्या बसथांब्यांमुळे टिटवाळावासीय भिरभिरले आहेत. आपण केडीएमसीच्या हद्दीत राहतो की उल्हासनगर पालिकेच्या, असा संभ्रम नागरिकांमध्ये आहे.

नागरिकांनी वारंवार मागणी करूनही कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेने कल्याण-टिटवाळा मार्गावर बस सेवा सुरू केलेली नाही. मात्र उल्हासनगर पालिकेने परिवहन सेवा सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील मांडा-टिटवाळा विभागात ठिकठिकाणी उल्हासनगर महानगरपालि का परिवहन विभागाने बसथांबे उभारून फलक लावले आहेत. रेल्वे गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण पश्चिम विधानसभा संघटक किशोर शुक्ला काही दिवसांपूर्वी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन कल्याण ते टिटवाळा अशी बस सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती. याबाबतची कार्यवाही अद्याप झालेली नसतानाच उल्हासनगर महानगरपालिकेने पुढाकार घेत आपली सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कल्याण-डोंबिवली महापालिकेने आपला कारभार गतिमान करून कल्याण-टिटवाळा बस सेवा सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या मार्गावरून धावणार बस
उल्हासनगर परिवहन उपक्रमांतर्गत शहाड, आंबिवलीमार्गे माताजी मंदिर रोड, टिटवाळा स्थानक, स्वामी विवेकानंद चौक, निमकर नाका, छत्रपती संभाजी महाराज चौक, गणेश मंदिर रोड, महागणपती मंदिर चौक, धर्मवीर आनंद दिघे मार्ग, सावरकरनगर परिसरासह विविध ठिकाणी बस थांबे सुरू केले आहेत.