परभणीत नवा मोंढा परिसरातील पाच दुकाने फोडली

463

परभणी शहरातील मोंढा बाजारपेठेतील पाच दुकाने फोडून सुमारे 25 ते 30 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळविली असल्याचे आज सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच शहरातील मोंढा बाजारपेठेतील पाच दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी 25 ते 30 हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना आज सोमवारी  पहाटे उघडकीस आली. या घटनेने व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाकडाऊनमुळे जिल्ह्यातील बाजारपेठा बंद आहेत. 15 दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी स्वतंत्र आदेश काढून कृषी बाजारपेठ सुरु ठेवण्याची सवलत दिली होती.

व्यापार्‍यांनीही मोठ्या प्रमाणात कृषीमाल विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. मोंढ्यातील महेश मणियार यांचे किसान कृषी उद्योग हे दुकान असून शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. फर्निचरची नासधूस करुन गल्ल्यातील रोख 10 हजार रुपये चोरुन नेले. या दुकानाच्या शेजारीच प्रमोद नंदलाल बंग यांच्या भुसार दुकानाचेही शटर वाकवून 5 हजार रुपये चोरट्यांनी चोरले. त्या शेजारीच साई समर्थ या दुकानाचेही शटर वाकविण्यात आले. मात्र चॅनेल गेटमुळे चोरट्यांना दुकानात प्रवेश करता आला नाही. याच भागातील मारोती लोंढे यांचे सरस्वती अ‍ॅग्रो एजन्सी तसेच त्याच्या बाजुला असलेल्या विशाल अंग्रो एजन्सी या दोन्ही दुकानाचे शटर वाकवून रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा नोंद झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या