ऑनलाईन वाईनच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन वाईन मागवण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची सायबर ठगाने फसवणूक केली आहे. फसवणूक प्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार या मालाड पश्चिम परिसरात राहत असून त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. तीन दिवसांपूर्वी रात्री त्यांनी गुगल सर्च इंजिनवरून एका वाईन शॉपचा नंबर शोधला. त्या नंबरवर महिलेने फोन करून वाईनची ऑर्डर दिली. वाईनचे पैसे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतील, असे महिलेला सांगितले. तिने वाईनचे दोन हजार रुपये गुगल पेद्वारे पेड केले. त्यानंतर ठगाने महिलेला फोन करून गुगल पेमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. वाईनची डिलिव्हरी करताना बिल दाखवावे लागेल, असे सांगण्यात आले. ठगाने महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या खात्यातून काही रक्कम काढली. पैसे जास्त कापले गेल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर महिलेने त्या ठगाला फोन केला. जास्तीची रक्कम पुन्हा खात्यात पाठवतो अशा ठगाने भुलथापा मारल्या. भुलथापा मारून महिलेच्या खात्यातून 1 लाख 43 हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. ते पैसे कोणत्या खात्यात जमा झाले याचा तपशील पोलीस काढत आहेत. ऑनलाईनच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून पोलिसांनी वाईन, दारूच्या नावाखाली फसवणूक करणाऱया ठगांचे नंबर प्रसिद्ध केले होते.