
लाडक्या बहिणींच्या मागे शुक्लकाष्ठ लागले आहे. लाखो लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरवले. आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची पडताळणी सरकार करणार आहे. कारण या बहिणींनी योजनेसाठी ‘भाऊजीं’ची जी कागदपत्रे दिली होती त्याचा वापर गुन्हेगारांच्या एका टोळीने हवालासाठी केल्याचे समोर आले आहे.
जुहू पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. त्यानंतर पोलीस आणि सरकारही चक्रावून गेले. महिला व बालविकास विभागाची झोपच उडाली. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी युद्धपातळीवर करण्याचे आदेश महिला व बाल विकास विभागाने दिले आहेत.
लाडक्या बहिणी सरकारवर नाराज
दीड हजार रुपयांचे वाढवून 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीने निवडणुकीपूर्वी केली होती. अद्याप ते 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. त्यावरून नाराजी असतानाच आता फेरपडताळणीच्या निर्णयावरूनही त्या नाराजीत आणखी भर पडली आहे. या फेरपडताळणीच्या नावाखाली लाखो लाभार्थ्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे.