
हिंदुस्थानात अशी बहुसंख्य मंडळी आहेत, ज्यांना चहा मनापासून आवडतो. त्याचं चहाप्रेम इतकं असतं की दिवसाला ते किती चहा पितात याचा नेमच नसतो. गवती चहाची पात, मनाजोगती साखर, आलं-वेलची ठेचून भरपूर उकळून कडक चहामध्ये दूध घालून ते पिणारी मंडळी यांच्यासाठी ते पेय चहा नाही तर अमृततुल्य द्रव्य बनत असतं. मात्र असं म्हणतात की भरपूर चहा प्यायला तर त्या माणसाची त्वचा काळवंडते आणि त्याचा रंग बदलतो. या समजामुळे इच्छा आणि आवड असूनही अनेकजण चहा पिणं टाळतात. मात्र खरोखर असं होतं का ? चहा प्यायल्याने त्वचेचा रंग बदलतो का ?
आपल्या शरीराच्या त्वचेचा रंग हा मेलॅनिनच्या अनुवांशिकतेवर अवलंबून असतो. मेलॅनिनच्या कमी अधिक प्रमाणामुळे त्वचेचा गोरा, गव्हाळ किंवा कृष्णवर्णीय होत असतो. चहाचे अत्याधिक सेवन केल्याने मेलॅनिनवर काही परिणाम होतो का , याचं उत्तर शोधून काढण्याचा संशोधकांनी प्रयत्न केला होता. संशोधनानुसार, चहा प्यायल्याने आपला रंग अजिबात काळवंडत नाही, परंतु याउलट जर आपण योग्य प्रमाणात चहा प्यायलो तर तो आपल्या शरीरातील अनावश्यक द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते आणि त्याचा त्वचेच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.
चहा आणि गैरसमज
चहामध्ये कॅफिन असते ज्यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो असं बोललं जातं. चहा प्यायल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून असे गैरसमज पसरवले जातात असं संशोधकांचं म्हणणं आहे.
चहा पिण्याचे फायदे
चहामध्ये अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो. अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील मुक्त पेशींवरील प्रभाव कमी करतात. चहासह अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. तसेच हृदयविकार, कर्करोग आणि वृद्धत्वाच्या समस्यांचा धोका चहामुळे बर्याच प्रमाणात कमी होतो.
चहा प्यायल्याने होणारे नुकसान
चहा प्यायचे जेवढे फायदे आहत तेवढेच तोटे देखील आहेत. रिकाम्या पोटी चहा पिणे टाळलं पाहिजे, कारण रिकाम्या पोटी जर आपण चहाचे सेवन केले तर पित्तनिर्मिती होण्याची दाट शक्यता असते. या पित्ताचा पचन क्रियेवरही परिणाम होत असतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात जळजळीचे आणि अल्सरचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

























































