चिन्यांची नांगी ठेचता येणार, 40 मिनिटात लष्कर डोकलामपर्यंत पोहचणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान, चीन आणि भुतान या तीन देशांच्या सीमा एकत्र येणाऱ्या डोकलाम या भागापर्यंत पोहोचण्यासाठी आता हिंदुस्थानी लष्कराला अवघे 40 मिनिट लागणार आहे. सीमा रस्ते संघटनेने (Border Roads Organisation – BRO) भीम बेस ते डोकला बेसपर्यंत रस्ता बनवला आहे. याआधी लष्काराला येथे पोहोचण्यासाठी तब्बल 7 तास लागायचे. परंतु 2017 मध्ये हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य आमनेसामने आल्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी तात्काळ रस्त्यांचे जाळे वाढवण्याचे निर्देश दिले होते.

लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भीम बेस डोकलामपर्यंत रस्त्याचे जाळे पोहोचल्याने लष्कराला या स्थानापर्यंत पोहोचण्यास आणि हत्यांरांची ने-आण करण्यासाठी खूपच कमी वेळ लागणार आहे. शत्रूराष्ट्राच्या कोणत्याही कारवाईस तात्काळ प्रत्युत्तर देण्यासाठी हा रस्ता उपयोगी ठरणार आहे. बीआरओने आतापर्यंत हिंदुस्थान-चीन सीमेवर 3346 किलोमीर लांबीच्या 61 रस्त्यांची निर्मिती केली आहे. बीआरओ 2019 मध्ये चीन सिमेवर आणखी 11 रस्त्यांची निर्मिती करणार आहे. त्यामुळे चीनने हिंदुस्थानच्या सुरक्षेला आणि आत्मसन्मानाला धोका पोहचवण्याचे कोणतेही चुकीचे पाऊल उचलल्यास त्याची नांगी तात्काळ ठेचण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असणार आहे.

doklam

हिंदुस्थानी लष्काराच्या रणनितीच्या दृष्टीने डोकला बेस महत्त्वाचा आहे. सिक्कीमच्या सीमेवर डोकलाम या पठाराच्या जवळ असणारा हा बेस 2017 मध्ये सर्वात जास्त चर्चेत आला होता. दोन वर्षापूर्वी चिनी सैन्य आणि हिंदुस्थानचे सैन्य येथे आमनेसामने आले होते. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने येथे घुसखोरी केल्यानंतर लष्कराची त्यांच्यासोबत झटापट झाली होती. यावेळी दोन्ही सैन्याने माघार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल 73 दिवस दोन्ही सैन्य आमनेसामने होते.

दोन्ही देशातील हा वाद अखेर 28 ऑगस्ट, 2017 ला संपला होता. त्यावेळी दोन्ही देशांनी वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. यानतंर हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांच्यात वुहान शिखर संमेलनादरम्यान सीमारेषेबाबत चर्चा झाली होती. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी यावेळी महत्त्वाची पावलं उचलण्यात आली होती.