
एमआयडीसी खंबाळपाडय़ातील कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे श्वास घेणेही मुश्कील झालेल्या डोंबिवलीकरांची ‘नाकाबंदी’तून सुटका होणार आहे. अंतर्गत गटारातून सोडण्यात येणारे हे रासायनिक सांडपाणी आता थेट जलशुद्धीकरण केंद्र प्रकल्पाकडे वळविण्यात येणार आहे. त्यासाठी खाडीला जोडल्या गेलेल्या अंतर्गत गटारावर बंधारा बांधण्यात आला असून चेंबरमध्ये सांडपाणी खेचून घेण्यासाठी पंप बसविण्यात आले आहेत.
तीन आठवडय़ांपूर्वी औद्योगिक वसाहतीमधील खंबाळपाडा परिसरात रासायनिक सांडपाण्याची दुर्गंधी येत असल्याने येथील रहिवासी हैराण झाले होते. खंबाळपाडा आणि भोईरवाडी या परिसराला लागूनच असणाऱ्या नाल्यातून दुर्गंधी येत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (कामा) ने तत्काळ कार्यवाही केली आहे. कामा संघटना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषणकारी परिसराची पाहणी केल्यानंतर अंतर्गत गटारातून वाहणाऱ्या रासायनिक पाण्यातून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे या गटाराच्या तोंडाशी रेती टाकून बंधारा घालण्यात आला आहे, तर मूळ गटारातून पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी एक पंप आणि चेंबर बांधून तात्पुरती व्यवस्था केली आहे. या पंपातून पाणी चेंबरमध्ये खेचले जाते आणि हे पाणी जलशुद्धीकरणासाठी प्रक्रिया प्रकल्प पेंद्राकडे सोडले जाते, अशी माहिती कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली. यावेळी माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी उपस्थित होते.
एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी थेट जलशुद्धीकरण केंद्रात जाणार, दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती
सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी ज्या ठिकाणी चेंबर बांधला आहे तेथे पंपही बसविण्यात आला आहे. चेंबर भरले की थोड्या वेळासाठी हा पंप बंद केला जातो. या चेंबरमधील पाणी कमी झाले की पुन्हा पंप सुरू होतो. या सर्व प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी येथे दोन शिफ्टमध्ये दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान ही व्यवस्था तात्पुरती असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी एमआयडीसीला पाठविण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.






























































