
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. अमेरिकेत आता ‘इंडियन’ या शब्दाचा वापर व्हायला नको, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. ट्रम्प यांचे हे विधान हिंदुस्थानी नागरिकांसाठी नसून तेथील नेटिव्ह अमेरिकन्ससाठी केले आहे. नेटिव्ह अमेरिकन्स म्हणजेच अमेरिकेतील मूळ रहिवाशांसाठी आहे.
अमेरिकेचा खंडाचा शोध लावणारे ख्रिस्तोफर कोलंबस 1492 साली हिंदुस्थानकडे जाणारा नवीन मार्ग शोधण्यासाठी पश्चिम दिशेला निघाले होते. यावेळी ते हिंदुस्थानच्या बाहेरील भागात पोहोचले असल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी तिथे भेटलेल्या स्थानिक लोकांना ‘इंडियन्स’ हे नाव दिले. यानंतर ते नाव पुढे देखील तसेच राहिले. कालांतराने, हे नाव वसाहतींच्या करारांमध्ये, सरकारी धोरणांमध्ये आणि शेकडो वर्षांच्या अमेरिकन शब्दसंग्रहात समाविष्ट झाले.
तेव्हापासून तेथील मूळ जमातींसाठी ( नेटिव्ह ट्राइब्ससाठी) ‘इंडियन’ हा शब्द वापरला जात होता. इंडियन्स हा शब्द तेथील मूळ जमातीच्या लोकांना वसाहतवादाची आणि चुकीच्या माहिती आठवण करून देतो. म्हणूनच तो एक अपमानजनक (offensive) शब्द मानला जाऊ लागला. त्यानंतर हा शब्द वापरण्यास मनाई असताही काही लोक अजूनही हा शब्द त्यांची ओळख म्हणून वापरत आहेत.
दरम्यान ट्रम्प य़ांनी हा शब्द वापरण्यास सक्त मनाई केली आहे. ट्रम्प यांच्या मते, ‘इंडियन’ हा शब्द केवळ हिंदुस्थानी लोकांसाठी वापरला जावा. नेटिव्ह जमातींसाठी त्याचा वापर करू नये.



























































