
टॅरिफमुळे जगाची चिंता वाढवणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगाची चिंता आणखी वाढवण्याची शक्यता आहे. नायजेरियात ख्रिश्चनांचे हत्याकांड होत आहे. त्यामुळे अमेरिकेला कठोर निर्णय घ्यावा लागले. अमेरिका नायजेरियावर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढणार आहे.
अमेरिका आता नायजेरियात युद्ध आघाडी सुरू करण्याची शक्यतावर्तवण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की काही आफ्रिकन देशांमध्ये ख्रिश्चनांना सतत मारले जात आहे. त्यांचा रोख नायजेरियाकडे असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिका लवकरच नायजेरियात हवाई हल्ले करू शकते. ख्रिश्चनांना मारणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अनेक योजना आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यापूर्वी, ट्रम्प यांनी म्हटले होते की नायजेरियात ख्रिश्चन धर्माला अस्तित्वाचा धोका आहे, हजारो ख्रिश्चन मारले जात आहेत. या सामूहिक हत्येसाठी कट्टरपंथी इस्लामी जबाबदार आहेत. ट्रम्प यांनी असे संकेत दिले आहेत की, ते नायजेरियातील काही विशिष्ट ठिकाणी हवाई हल्ले करू शकतात किंवा अमेरिकन सैन्य पाठवू शकतात. फ्लोरिडामध्ये आठवड्याचा शेवट घालवल्यानंतर रविवारी संध्याकाळी वॉशिंग्टनला परतताना एअर फोर्स वनवरून पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी त्यांच्या युद्ध विभागाला शक्य तितक्या जलद लष्करी कारवाईसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
नायजेरियात जमिनीवर सैन्य किंवा हवाई हल्ल्याची योजना आहे का,असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, अनेक योजना आहेत, मी अनेक गोष्टींचा विचार करत आहे. नायजेरियात मोठ्या प्रमाणात ख्रश्चनांचे हत्याकांड सुरू आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. ट्रम्प यांनी शुक्रवारी नायजेरियाला मदत थांबवण्याची धमकी दिली आणि इशारा दिला की जर आफ्रिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश त्याच्या ख्रिश्चन लोकसंख्येचे संरक्षण करण्यात अयशस्वी झाला तर अमेरिका लष्करी कारवाई करू शकते. व्यापक हिंसाचारासाठी कट्टरपंथी इस्लामिक घटकांना जबाबदार धरत ते म्हणाले, नायजेरियातील ख्रिश्चन धर्माला अस्तित्वाचा धोका आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या विशेष चिंतेच्या देशांच्या यादीत नायजेरियाचा समावेश करण्याची घोषणा केली. या यादीत असे देश समाविष्ट आहेत जे अमेरिकेला धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन वाटतात. अमेरिकेत चीन, म्यानमार, उत्तर कोरिया, रशिया आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.
नायजेरियाने रविवारी सांगितले की, जर त्याच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर केला गेला तर ते इस्लामिक दहशतवाद्यांशी लढण्यासाठी अमेरिकेच्या मदतीचे स्वागत करेल. नायजेरियातील ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांमधील संघर्ष १९५० च्या दशकात सुरू झाला. हे घटनांच्या संदर्भातून दिसून येते. २००९ नंतर बोको हराम आणि फुलानी गुराखी सारखे गट कट्टरपंथी इस्लामिक घटकांचे लक्ष्य बनले. त्यांचे प्राथमिक लक्ष्य ग्रामीण ख्रिश्चन गावे आणि चर्च होते. एका अहवालानुसार, २००९ पासून ख्रिश्चनविरोधी हिंसाचारात ४५,००० हून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत आणि हजारो चर्च नष्ट झाले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेने नायजेरियाविरुद्ध कारवाई केल्यास जागतिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.





























































