महाभियोग खटल्यात डोनाल्ड ट्रम्प निर्दोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
donald-trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महाभियोग खटल्यातून क्लिन चिट मिळाली आहे. ट्रम्प यांच्यावर अधिकारांचा गैरवापर आणि संसदेच्या कामात अडथळे आणल्याचा आरोप होता. त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई 21 जानेवारीपासून सिनेटमध्ये सुरू झाली होती. सिनेटने ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप फेटाळून लावत त्यांची आज निर्दोष सुटका केली.

ट्रम्प यांच्यावर हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज्कडून महाभियोगाचा प्रस्ताव आला होता. त्या सभागृहात विरोधी डेमोक्रेटिक पक्षाचे बहुमत आहे. रिपब्लिकन पक्षाने आज 52-48 च्या फरकाने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. याशिवाय काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून 53-47 मतांनी त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. राष्ट्राध्यक्षांवर महाभियोगाची कारवाई होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी अँड्रय़ू जॉन्सन आणि बिल क्लिंटन यांच्यावर ही कारवाई झाली होती.

नेमके आरोप काय…

अधिकाराचा गैरवापर
ट्रम्प यांनी यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडियर जेलेंस्की यांच्यावर डेमोक्रेटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार जो बिडन आणि त्यांच्या मुलाविरोधात भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी दबाब टाकला. जो बिडन हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी मानले जात आहेत.

संसदेच्या कामात अडथळे
ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाच्या तयारीसाठी हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज्ने चौकशी केली. त्यासाठी सभागृहाने ट्रम्प प्रशासनाकडून काही कागदपत्रांची मागणी केली. मात्र ट्रम्प यांनी कागदपत्रे आणि साक्षीदार रोखून धरले.