‘या’ दोन प्रकरणांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गोत्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिग्टन 

पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनिअल्स आणि ‘प्लेबॉय’ मासिकाची एक माजी मॉडेल या दोघीजणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे कथित प्रेमसंबंध जगजाहीर करणार होत्या. परंतु या दोघींना ट्रम्प यांच्या आदेशावरून 2.80 लाख डॉलर्सची लाच देऊन त्यांची बोलती बंद केली असा खळबळजनक गौप्यस्फोट ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी न्यायालयात केला आहे. दुसरीकडे ट्रम्प यांचे माजी निवडणूक प्रचारप्रमुख पॉल मॅनफोर्ट यांना करचुकवेगिरी केल्याप्रकरणी कोर्टाने दोषी ठरविले आहे. या दोन्ही प्रकरणांमुळे ट्रम्प हे कायदेशीरदृष्टय़ा गोत्यात आले आहेत.

न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्हा कोर्टात कोहन यांनी करचोरी, बँकेशी खोटे बोलणे, वित्तीय उल्लंघन केल्याचा गुन्हा कबूल आहे. ट्रम्प यांच्याविरुद्ध दोन महिलांनी काहीही बोलू नये यासाठी एवढे डॉलर्स दिले. या महिला तेव्हा राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असलेले ट्रम्प यांच्याशी असलेले कथित प्रेमसंबंध उघड करणार होत्या असे कोहेन यांनी कोर्टास सांगितले. दरम्यान, करचुकवेगिरीप्रकरणी कोहेन यांना 12 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.