
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कश्मीर राग आळवला आहे. हिंदुस्थानची तयारी असल्यास आपण कश्मीरप्रश्नी मध्यस्थता करण्यास तयार असल्याने ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. मात्र, आपल्या मध्यस्थतेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशीही याबाबत आपले बोलणे झाले आहे. त्यांची चर्चेची तयारी असल्याने त्यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येऊन ही समस्या सोडवावी. त्यासाठी मध्यस्थता करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून ही समस्या असून त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एखादा मध्यस्थ नेमून ही समस्या सोडवावी असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
‘Would Intervene If India And Pakistan Want Me To,’ @realDonaldTrump Again Offers Mediation On #Kashmir. pic.twitter.com/1fqRxkpRMt
— Geeta Mohan گیتا موہن गीता मोहन (@Geeta_Mohan) August 2, 2019
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान कश्मीरप्रश्नी मध्यस्थता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला विनंती केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र, तातडीने हिंदुस्थानने या दाव्याचे खंडन केले. तसेच कश्मीरप्रश्नी कोणच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचे हिंदुस्थानने स्पष्ट केले. कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे, हे हिंदुस्थानचे धोरण आहे. या समस्येत तिसऱ्या देशाची गरज नसल्याचे देशाचे धोरण ठरले आहे, त्यात बदल होणार नाही,असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करणार नाही असेही हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर देशात मोठा वाद झाला होता. तो संसदेपर्यत पोहचला होता. हिंदुस्थानने हा दावा खोडून काढल्यानंतर अमेरिकेतही ट्रम्प यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा कश्मीर राग आळवला आहे. त्यामुळे पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता आहे.


























































