ट्रम्पवाणी – मास्क घालणारे कोरोनाग्रस्त असतात!

मास्क घालणारे लोक कायमच कोरोनाग्रस्त असतात, असे वादग्रस्त वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. मियामी या ठिकाणी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीलाही काही दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा झाली होती. पण यातून ते सुखरूप बाहेर आले. व्हाईट हाऊसमध्ये 26 सप्टेंबरला एक कार्यक्रम झाला होता. ट्रम्प यांना कोरोना या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे झाल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क घातले नव्हते. असे असतानाही आता मास्क घालणाऱ्यांबाबत ट्रम्प यांनी आक्षेप घेणारे विधान केले आहे.

अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. तसेच ‘माझी तब्येत आता उत्तम आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसला तुमच्या जीवनावर वरचढ होऊ देऊ नका’ असेदेखील ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र आता ट्रम्प यांनी मास्क घालणारे लोक कायमच कोरोनाग्रस्त असतात असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या