
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुढील वर्षी हिंदुस्थानच्या भेटीवर येऊ शकतात. स्वतः ट्रम्प यांनीच एका पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मी हिंदुस्थानात यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या मागे लागले आहेत. आम्ही चर्चा करू आणि ठरवू, असे ट्रम्प यांनी सांगितले. मी लावलेल्या टॅरिफमुळे जगातील 5-6 युद्धे थांबली, असा दावाही ट्रम्प यांनी केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर एकूण 50 टक्के टॅरिफ लादले आहे. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात केलेल्या दाव्यांमुळे हिंदुस्थान आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती. हिंदुस्थानाने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी कमी करावी, यासाठी ट्रम्प यांनी दबाव आणला होता. त्यानंतर आता हिंदुस्थानाने रशियन तेलाची खरेदी कमी केल्याचा दावा ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा केला. ते म्हणाले की, हे चांगले आहे. मोदी यांनी बहुतांशी रशियन तेल खरेदी कमी केली आहे.
हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात सांगितले की, ट्रम्प यांच्या दौऱयाबाबत सध्या सांगण्यासारखे काहीही नाही. काही असल्यास माहिती दिली जाईल.
‘8 पैकी 5-6 युद्धे टॅरिफमुळे थांबली’
माझ्यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा केला. ते म्हणाले की, मी थांबविलेल्या 8 युद्धांपैकी 5-6 युद्धे ही टॅरीफमुळे थांबली. हिंदुस्थान आणि पाकिस्तान दोघेही एकमेकांवर हल्ला करीत होते. एकूण 8 विमाने पाडण्यात आली. तुम्ही असेच लढणार असाल तर मी तुमच्यावर टॅरीफ लावणार, असे मी त्यांना सांगितले आणि 24 तासांमध्ये युद्ध थांबले.



























































