ट्रम्प यांचा हिंदुस्थानवर आणखी एक टॅरिफ बॉम्ब! कर 25 वरून 50 टक्के वाढवला, 27 ऑगस्टपासून होणार लागू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याचा कार्यकारी आदेश बुधवारी सायंकाळी जारी केला. यामुळे हिंदुस्थानवर एकूण 50 टक्के आयात शुल्क लागू झाले आहे. हे पाऊल हिंदुस्थानने रशियाकडून सातत्याने तेल खरेदी केल्याच्या पार्श्वभूमीवर उचलले गेले आहे, असे अमेरिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशानुसार, हा कर 21 दिवसांच्या आत लागू होईल, म्हणजेच 27 ऑगस्ट 2025 पासून, तो हिंदुस्थानातून अमेरिकेत पाठवलेल्या वस्तूंवर लागू होईल. दरम्यान, याआधीही अमेरिकेने हिंदुस्थानवर 25 टक्के आयात शुल्क आणि दंड लादला होता, ज्याचे कारण रशियाकडून तेल खरेदी असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.

या नव्या शुल्कामुळे हिंदुस्थानच्यानिर्यात क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः ऑटोमोबाईल, कापड, इलेक्ट्रॉनिक्स आणि रत्न-दागिने यांसारख्या क्षेत्रांना याचा फटका बसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, हे शुल्क 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत लागू राहिल्यास हिंदुस्थानच्या जीडीपीमध्ये 0.2 टक्के ते 0.5 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.