
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (29 जुलै) एक मोठे विधान केले की, हिंदुस्थानवर 20 ते 25 % पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादले जाऊ शकते. यावर त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, अद्याप या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, हिंदुस्थान एक चांगला मित्र आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानने अनेक देशांच्या तुलनेत अमेरिकन वस्तूंवर सर्वाधिक शुल्क लावले आहेत. ते म्हणाले की, हिंदुस्थानने आतापर्यंत जवळजवळ सर्वाधिक शुल्क आकारले आहे.
हिंदुस्थानसह अनेक देश अमेरिकेसोबत व्यापार करार अंतिम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सहाव्या फेरीच्या बैठकीसाठी अमेरिकन टीम पुढील महिन्यात हिंदुस्थानात दाखल होणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही देशांमधील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरील पुढील फेरीच्या चर्चेसाठी अमेरिकेचे पथक 25 ऑगस्टला हिंदुस्थानला भेट देणार आहे.
काही क्षेत्रांमध्ये हिंदुस्थान आणि अमेरिकेत टॅरिफवरुन मतभेद आहेत. विशेषतः कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ क्षेत्रात, हिंदुस्थानने आपल्या भूमिकेशी तडजोड केलेली नाही. हिंदुस्थान आजही अनुवांशिकरित्या सुधारित पिकांच्या (जसे की सोयाबीन आणि मका) आयातीला विरोध करतो आणि देशांतर्गत दुग्ध बाजारपेठ परदेशी कंपन्यांसाठी उघडू इच्छित नाही.
ट्रम्प यांनी जगभरातील देशांना इशारा दिला होता की, अमेरिका स्वतंत्र व्यापार करार न केलेल्या देशांकडून 15 ते 20 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) आकारू शकते. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी नुकतेच सांगितले की, अमेरिकेला हिंदुस्थानसोबत वाटाघाटी करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे जेणेकरून ते अमेरिकन निर्यातीसाठी आपला बाजार आणखी खुला करण्यास तयार आहेत की नाही हे ठरवू शकतील.