“विश्वासघात केल्यास इराणचा सर्वनाश अटळ; अंतिम करार होईपर्यंत..”, युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांच्या युद्धविरामाचा निर्णय झाला आहे. या निर्णयानंतर आखातातील तणाव कमी होईल असे वाटत होते. मात्र इस्रायलने लेबनानवरील हल्ले सुरूच ठेवल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट करत इराणला इशारा दिला. जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये अंतिम करार होत नाही तोपर्यंत अमेरिकन सैन्य इराणच्या सीमेवरून एक इंचही हटणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. तसेच इराणने विश्वासघात केल्यास सर्वनाश अटळ आहे, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. ‘ट्रूथ सोशल’वर पोस्ट करत ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.

जोपर्यंत इराण कायमस्वरूपी कराराच्या सर्व अटी मान्य करत नाही, तोपर्यंत अमेरिकन सैन्य तिथून एक इंचही मागे हटणार नाही. अमेरिकेची सर्व जहाजे, विमाने, युद्धसामग्री आणि सैनिक इराणच्या चहूबाजूंनी तैनात राहतील. जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी ही सुरक्षित असावी आणि पूर्णपणे उघडली जाईल. कराराच्या अटींचा भाग म्हणून इराणकडे कोणतेही अण्वस्त्र नसावे. या अटींचे उल्लंघन झाल्यास पुन्हा एकदा हल्ले सुरू होतील. हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि विध्वंसक असेल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

इस्रायल अमेरिकेवर नाराज? युद्धविरामाच्या प्रक्रियेची शेवटच्या क्षणापर्यंत माहिती दिली नसल्याचे वृत्त

याच संदर्भात त्यांनी व्हाईट हाऊसमध्येही माध्यमांशी संवाद साधला. आम्ही इराणला एक संधी दिली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही आमची सुरक्षा कमी केली आहे. आमचे महान सैन्य इराणच्या चहूबाजूने तैनात आहे. जर इराणने तात्पुरत्या युद्धविरामाचा फायदा घेऊन विश्वासघात केला किंवा करार मोडला तर त्यांच्यावर आतापर्यंतची सर्वात घातक कारवाई होईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.

दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी जमिनीवर परिस्थिती वेगळी आहे. युद्धविरामानंतरही इस्रायलने लेबनानमधील हिजबुल्लावर हल्ले तीव्र केले आहेत. बुधवारी इस्रायलच्या हल्ल्यात 250 हून अधिक लोक मारले गेले. त्यामुळे इराणने संताप व्यक्त केला आहे.

लेबनानमधील शांतता हा देखील युद्धविरामाचा भाग असल्याचे इराणचे म्हणणे आहे. तर लेबनान या करारात येत नाही, असे डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इस्रायलचा लेबनानवर भीषण हल्ला; २५४ जणांचा मृत्यू