
बगदादमधील अमेरिकी दूतावासावर इराणी दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात आमच्या एकाही अधिकाऱयाला काही झाले तर त्याची मोठी किंमत इराणला मोजावी लागेल. ‘हॅप्पी न्यू इयर’ हा इशारा नव्हे तर धमकीच समजा, अशा कडक शब्दांत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षीदिनीच इराणला खडे बोल सुनावले.
इराणचा पाठिंबा असलेल्या इराकी शिया दहशतवादी गटाने मंगळवारी बगदादमधील अमेरिकन दूतावासाच्या परिसरात घुसून मोठी तोडफोड केली होती. इराण समर्पित हेजबुल्ला गटाच्या हजारो सदस्यांनी इराकमधील अमेरिकन हवाईहल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या 25 दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून बगदादच्या अमेरिकन दूतावासाला लक्ष्य केले होते. त्यांनी दगडफेड करीत एम्बॅसीचे दरवाजे, कंपाऊंडची तोडफोड केली आणि जाळपोळ केली होती. अखेर इराक सरकारचे सुरक्षा रक्षक व अमेरिकन फौजेने या हल्लेखोरांविरोधात कारवाई करीत त्यांना पिटाळून लावले होते.
युद्ध आम्हालाही नकोय, पण दहशतवादी गटांची मुजोरी नको!
इराणविरुद्ध थेट युद्धाची शक्यता फेटाळत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध आम्हालाही नकोय, पण इराणी दहशतवादी गटाची मुजोरी मात्र आम्ही सहन करणार नाही. वेळीच त्यांना ठेचून काढू असा सज्जड दमही आपल्या नववर्षाच्या ट्विटमधून दिला.
इराकचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे आम्ही अमेरिकेचे आद्य कर्तव्य मानतो. त्यामुळे इराकमध्ये निवासात असलेल्या अमेरिकन अधिकाऱयांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही हल्लेखोरांना तत्काळ ठेचण्याचे काम करू.
डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष

























































