देश-विदेश – उद्योगपतींसाठी ट्रम्प यांची ‘व्हाईट हाऊस’मध्ये डीनर पार्टी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाईट हाऊस’मध्ये एका आलिशान डीनर पार्टीचे आयोजन केले. या पार्टीत अमेरिकेतील अब्जाधीश, व्यापारी, उद्योगपती सहभागी झाले. ही पार्टी ‘व्हाईट हाऊस’मध्ये नवीन बॉलरूम बनवण्यासाठी देणगी जमवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत 130 पाहुणे सहभागी झाले होते. नवीन बॉलरूम बनवण्यासाठी जवळपास 25 कोटी डॉलर खर्च येणार आहे. या बॉलरूमध्ये 650 लोक बसू शकतील.

निवृत्त अधिकाऱ्याकडे सापडली कोटय़वधींची बेहिशेबी मालमत्ता

मध्य प्रदेशातील राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता सापडली. ग्वालियरमध्ये लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकून त्याच्या घरातून 1 कोटी 13 लाखांची रोख रक्कम, 4 किलो 221 ग्रॅमचे सोने, 8 किलो चांदी, लक्झरी गाडय़ा, महागडे परफ्युम, घडय़ाळे, फर्निचरचे कलेक्शन सापडले. इंदूर येथील फ्लॅटमध्ये जवळपास 9.66 कोटींची संपत्ती मिळाली आहे. तसेच तिन्ही फ्लॅटची एकूण किंमत 14.49 कोटी रुपयांहून अधिक आहे.

स्वदेशीसाठी चिनी वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लावा

हिंदुस्थानात स्वदेशीला बळकटी मिळावी असे जर केंद्रातील भाजप सरकारला वाटत असेल तर सरकारने अमेरिकेप्रमाणे चिनी वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लावावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केली. 100 टक्के टॅरिफ लावला तरच देशातील उत्पादकांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. भाजप केवळ स्वदेशीचा दिखावा करत आहे, परंतु आतून ते स्वतः विदेशी आहेत. विदेशी वस्तूंना रोखण्यासाठी सरकारी पातळीवर काहीच करण्यात आले नाही. असे अखिलेश यादव या वेळी म्हणाले.