शिर्डीत साईचरणी विक्रमी दान, साई महोत्सवात 23 कोटींची देणगी

नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर 25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या नऊ दिवसांच्या कालावधीत शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या ‘शिर्डी महोत्सवा’त देश-विदेशातून सुमारे 8 लाख भाविकांनी साईबाबांच्या  समाधीचे दर्शन घेतले. या काळात भाविकांनी तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपये इतके विक्रमी दान साईचरणी दिले आहे.

दानपेटीतून 6 कोटी 2 लाख 61 हजार 6 रुपये, देणगी काऊंटरद्वारे 3 कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपये, तर पीआरओ सशुल्क पासद्वारे 2 कोटी 42 लाख 60 हजार रुपये संस्थानला प्राप्त झाले. बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाविकांनी डिजिटल देणगीलाही मोठी पसंती दिली. डेबिट-व्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक आणि मनीऑर्डरद्वारे 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये जमा झाले आहेत.

सोनेचांदीच्या स्वरूपातही दान

सोने-चांदीच्या स्वरूपातही मोठय़ा प्रमाणावर दान प्राप्त झाले. यामध्ये 293 ग्रॅम सोने (किंमत सुमारे 36.38 लाख रुपये) आणि सुमारे 6 किलो चांदी (किंमत 9.49 लाख रुपये) यांचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका साईभक्ताने बाबांच्या चरणी तब्बल 80 लाख रुपये किमतीचा आकर्षक सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण केला. मुकुटामध्ये 153 पॅरेटचे मौल्यवान हिरे आणि 586 ग्रॅम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे.