डीएचएफएलचे वाधवान यांचा जामीन रद्द करा, ‘ईडी’चा हायकोर्टात अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनी लॉन्ड्रीग प्रकरणातील आरोपी व दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना लॉकडाऊनच्या काळात केलेला महाबळेश्वर दौरा चांगलाच भोवणार आहे. वाधवान यांनी जामिनाच्या अटीचे उल्लंघन केल्याने तसेच जमावबंदी कायदा मोडल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी करत अंमलबजावणी संचालनालयाने हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी वाधवान यांना हायकोर्टाकडून नोटीस बजवण्यात आली असून सुनावणी 23 एप्रिल पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

सनब्लिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे इक्बाल मिर्चीशी संबंध होते. याच कंपनीला वाधवान यांच्या मंजुरीने डीएचएफएलने 2010 – 11 मध्ये 2186 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते या रकमेचा उपयोग मिर्चीने मनी लॉन्ड्रिंगसाठी केला या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने वाधवानला 27 जानेवारी रोजी अटक केली. फेब्रुवारी महिन्यात सत्र न्यायालयाने वाधवान याला काही अटींवर जामीन दिला. दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही गेल्या आठवडय़ात कपिल वाधवान आपल्या कुटुंबियांसह महाबळेश्वर येथील फार्महाऊसवर गेले. तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब येताच याची माहिती त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱयांना दिली. दरम्यान ईडीच्या वतीने आज ऍड. पूर्णिमा कंथारीया यांनी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या समोर कपिल वाधवान यांचा जामिन रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज सादर केला. हायकोर्टाने हा अर्ज स्वीकारत सुनावणी 23 एप्रिल पर्यंत तहकूब केली.