अनोळखी मृतदेहाचा तपास करताना उलगडले दोन खून

834
murder-knife

नेवासे तालुक्यातील जळका शिवारात पोलिसांना एका अनोळखी मृतदेहाचा तपास करतांना दोन खुनाचा उलगडा करण्यास नेवासे पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना गजाआड केले आहे तर एक जण फरार आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर (जि. संभाजीनगर) भागातील एका महिलेचा मृतदेह तालुक्यातील जळका शिवारात रविवारी पोलिसांना मिळाला होता. प्रारंभी पोलिसांनी वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अज्ञात इसमाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होता. सोमवार पासून या खुनाचा तपास करत असताना पोलिसांना दोन खुनांचा उलगडा झाला. गंगापूर तालुक्यातील बोलठाण येथील अमिन रज्जाक पठाण व जवळच गाव असलेल्या तांदुळवाडी येथील सुखदेव थोरात हे दोघे मोलमजुरी करत होते. अमिनची सुखदेव थोरातच्या पत्नीबरोबरही ओळख झाली आणि त्यांचे जवळपास दोन वर्षं अनैतिक संबंध होते. हा प्रकार सुखदेवला समजल्याने वादावादी झाली. अनैतिक संबंधात अडसर ठरू लागल्याने प्रियकराच्या मदतीने गेल्यावर्षी 11 नोव्हेंबर 2018 रोजी सुखदेवच्या पत्नीने गंगापूर भागातच त्याचा गळा दाबून खून केला व मृतदेह कोपरगाव भागात नेऊन टाकला. गंगापूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद केली होती. त्याचा मोबाईल मात्र पत्नी वापरत होती.

रविवारी बोलठाण गावातीलच सुखदेव थोरातच्या नातेवाईक असलेल्या मंगल सोमीनाथ दुशिंग (35) हिला अमिन पठाणच्या अनैतिक संबंधांबाबत माहिती होती. ती अमिनला व सुखदेवच्या पत्नीकडे पैशांची मागणी करत होती. याला वैतागून अमिन पठाणसह इतर पाच जणांनी मंगल दुशिंगचा गळा दाबून खून केला आणि दोन दिवसांपूर्वी रविवारी तिचा मृतदेह तालुक्यातील जळका शिवारात आणून टाकला होता.

पोलिसांचा तपास भरकटावा यासाठी मृतदेहाजवळ वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या सुखदेव थोरातचा मोबाईल व त्याचेच नाव असलेली चिठ्ठी या आरोपींनी ठेवली होती. परंतु पोलिसांनी दोन दिवसातच या खुनाचा तपास करून पाचपैकी अमिन रज्जाक पठाण (35, रा. बोलठान, ता गंगापूर, जी संभाजी नगर), रतन छबूराव थोरात (28, रा. तांदुळ वाडी, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर), सोनाली सुखदेव थोरात (22, रा. तांदूळवाडी, ता. गंगापूर, जि संभाजीनगर), राजू भाऊसाहेब उघाडे (50, रा. गिडेगाव, ता. नेवासा, जि. नगर) या चौघांना नेवासे पोलिसांनी गंगापूर भागातून मंगळवारी अटक केली आहे. तर एक जण फरार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या