दुहेरी हत्याकांडाने नगर जिल्हा हादरला, नेवाशात वकिलासह सहकाऱ्याची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. नेवाशा तालुक्यातील जेऊर हैबती गावात जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकिल अ‍ॅड. संभाजी ताके आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. बुधवारी दुपारी धडलेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या हत्याकांडाप्रकरणी शरद शिवाजी ताके यास अटक केली असून हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे.

अ‍ॅड. ताके हे पत्नी आणि दोन मुलांसह भिंगार शहरानजीक असलेल्या नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील सौरभनगर कॉलनी येथे राहतात. ताके यांचे जेऊर हैबती हे मूळ आहे. बुधवारी ते गावाकडे काही कामानिमित्त गेले होते. तेथे त्यांच्या जमिनीचे वाद सुरू असून, ते प्रकरण नेवासे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अ‍ॅड. ताके यांच्याबरोबर त्यांचा सहकारीही गावी गेला होता.

जेऊर हैबती या गावीच त्यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला झाला. यात अ‍ॅड. ताके आणि त्यांचा सहकाऱ्याचा मृत्यू झाला. ताके यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्‍याची ओळख अजून पटलेली नाही. घटनास्थळी ताके यांची मोटारगाडी आढळल्याचे नेवासे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळाचा पंचनामा नेवासे पोलिसांकडून सुरू आहे. अ‍ॅड. ताके यांच्या हत्येची माहिती नगरसह भिंगार शहरात वार्‍यासारखी पसरल्याने खळबळ उडाली आहे. नगर आणि भिंगारमधील ताके यांच्या मित्रपरिवाराने नेवाशाकडे धाव घेतली आहे.