
>> डॉ. अनिल कुलकर्णी
यापूर्वी परीक्षा बंद झाल्यामुळे अनेकांनी अध्यापनच केले नाही व विद्यार्थ्यांनीही अभ्यास केला नाही. त्याचे दुष्परिणाम दिसून आले. तसे गृहपाठाचे होऊ नये. या संधीचा आपण आपल्या स्वतःची प्रगती करण्यामध्ये कसा उपयोग करून घेऊ शकू हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे व पालकांनी, शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व जाणवून दिले पाहिजे. तरच त्याला अर्थ आहे, नसता गृहपाठ बंद म्हणजे अभ्यास बंद, शाळा सुटली पाटी फुटली असे होऊ नये. गृहपाठ बंद होण्याने नवीन वस्तुपाठ तयार व्हायला हवा.
गृहपाठ बंद होणे हा केवळ आनंदाचा व सुटकेचा श्वास होऊ नये तर ती एक बदलती जीवनशैली म्हणून स्वीकारायला हवी. गृहपाठ बंद होण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि खरोखरच गृहपाठ बंद व्हायला हवा असेल तर अनेक ठिकाणच्या यशोगाथा विचारात घ्यायला हव्यात. अनेक मुलांचे गृहपाठ नाही तरी आणि अनेक हळवे पालकच करतात. वर्ग अध्यापन जर सशक्त असेल, लक्षात राहण्यासारखं असेल तर गृहपाठाची गरज नसते. काही आठवणीतले शिक्षक असेही आहेत की, ज्यांनी वर्गात कविता चालीवर म्हणत शिकवली होती. आजपर्यंत ही लक्षात राहते. अनेकांचे संबोध वर्गातच इतके दृढ व्हायचे की, पुन्हा त्यांना घरी काही करायची गरजही भासत नसे.
सगळेच न शिकवता काही भाग विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यासाठी घरी द्यावा काही भाग होम स्कुलिंगच्या माध्यमातून पालकांनी घ्यावा. याबाबतीत अभ्यासक्रमाची विभागणी करताना अमुक एक भाग वर्गात न शिकवता विद्यार्थ्यांनीच तो स्वयंअध्ययनाद्वारे शिकावा याबाबतीत त्यांचे उद्बोधन आणि प्रशिक्षण घेता येईल.
गृहपाठ करणे यांत्रिक क्रिया होणार असेल तर तो घ्यायचा कशासाठी? अनेक शिक्षक तो देतात, मुले किंवा पालक तो करून सादर करतात. तो तपासला जातो का? गृहपाठाच्या इतक्या प्रचंड वह्या शिक्षकाकडून तपासणं प्रामाणिकपणे होतं का? बऱ्याचशा गृहपाठावर चुकीच्या भागावरही फक्त टीक मार्क आढळते. कारण सीन लिहून खाली नुसती सही केलेली असेल तर त्याला काय अर्थ आहे? विद्यार्थ्यांचे वर्कबुक वर्षाअखेर रिकामेच असतात याला जबाबदार कोण?
शिक्षा मिळू नये म्हणून अनेक वेळा विद्यार्थीसुद्धा गृहपाठ कॉपी करून सादर करतात याकडे कसं पाहणार?
मुले गृहपाठ समजून करतात का? केवळ शिक्षकांनी सांगितले म्हणून एखादे काम दिखावा यासाठी करणे हे कितपत योग्य आहे? ऑनलाइनच्या काळात अनेक पालकांनी व्यायामाचे पाच मिनिटांचे व्हिडीओ काढून पाठवल्याने मुलांमध्ये व्यायाम करण्याची शिस्त लागली का? नसेल लागत तर हा देखावा कशासाठी? पालकांना प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्याने केली का नाही यासाठी एक व्हिडीओ क्लिप पाठवणं कितपत योग्य आहे? ती केवळ देखावा होईल. गृहपाठसुद्धा या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायला हवं. गृहपाठ मुले करत असताना तो चिंतन, मनन याचा भाग होतो का? नसेल होत तर फक्त सादरीकरण करत असतील तर त्याला काही अर्थ आहे का? याचाही विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
दप्तराचे ओझे कमी करायचे असेल तर गृहपाठाच्या वह्या कमी झाल्या तर बरेच ओझे कमी होईल. गृहपाठ देणं सोप आहे, पण ते तपासून देणं आवाक्याबाहेरचे शिक्षकांसाठी होऊन बसलं आहे.
न तपासलेले व चुकीचे केलेले गृहपाठ विद्यार्थ्यांनी करून आणले तर त्याला काही अर्थ आहे का?
कृतीतून मुले जर शिकली तर त्यांना गृहपाठाची गरज भासत नाही. कारण ते त्यांच्या चांगल्या लक्षात राहतं. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांना वर्गात कृती करायला संधी मिळत नाही. ग्राम मंगलच्या शाळांमधून मुले कृती करत गटागटांत बसून चर्चा करून शिकतात. शिक्षक फक्त मार्गदर्शक असतो या प्रकारचं अध्यापन वाढीस लागायला हवं. ग्राम मंगलने स्वतःची शैक्षणिक साहित्य निर्मिती केली आहे. कोणताही घटक शिकवताना शैक्षणिक साहित्याच्या साह्याने मुलं स्वतःच त्या प्रश्नांची उकल करत शिकत असतात. त्याच्यामुळे पुन्हा वेगळा गृहपाठ द्यायची आवश्यकता भासत नाही. गृहपाठाची विद्यार्थ्यांच्या मनात भीती बसायला नको. गृहपाठ केला नाही म्हणून अनेकांना शाळेत जायची, शिक्षकांकडून अवहेलना होण्याची भीती वाटते. मुळात शिक्षण आपण जेव्हा आनंदी प्रक्रिया म्हणतो, आनंददायी म्हणतो त्या वेळेस तिथे जावंसं वाटलं पाहिजे. शिक्षणाचे क्षण हवे हवे असे वाटले पाहिजे. मुलांना सुट्टी नकोशी वाटली पाहिजे अशा शाळा हव्यात.
आमची मुले घरी किती कामे करतात, श्रम प्रतिष्ठsची कामे कोणती करतात, आई-वडिलांना मदत करतात का? आईला स्वयंपाकघरात मदत करतात हे मेथी निवडण्याचा एक दिवसाचा व्हिडीओ पाठवून तो गृहपाठ होत नाही. त्याला मेथी निवडण्याची सवय हळूहळू लागायला हवी, त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना श्रमाची विभागणी करून दिली गेली पाहिजे, त्याची जाणीव करून दिली गेली पाहिजे. समाजातही दिसलं पाहिजे की, विद्यार्थी समाजासाठी काहीतरी करतात. केवळ एक दिवसाचे स्काऊट आणि गाईड किंवा वृक्षारोपण असल्या गोष्टी करून मुलांमध्ये मूल्य रुजणार कशी? आजच्या अभ्यासक्रमातून कोणती मूल्यं मुलांमध्ये रुजली आहेत? वैज्ञानिक दृष्टिकोन अनेक मुलांमध्ये रुजला नाही हे कोरोनाच्या काळात आपण पाहिलं. आपल्याकडे शिक्षणापेक्षा आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ मागच्या दोन वर्षांत आली होती. शाळा बंद होत्या, पण अस्तित्व टिकवायचे असेल, जगायचं असेल तर हात स्वच्छ धुतलेच पाहिजेत, अंतर ठेवलंच पाहिजे या जाणिवा मुलांमध्ये विकसित झाल्या, त्यांना कोणी गृहपाठ दिला नव्हता, पण जेव्हा अस्तित्व धोक्यात येतं तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी कराव्याच लागतात, तोच खरा गृहपाठ असतो. एक विषाणू आपल्याला गृहपाठ काय देतो, एकमेकांपासून विलगीकरणात काय राहायला लावतो, आपल्यामध्ये शिस्त निर्माण करण्याचा गृहपाठ आपल्याला काय देतो, आपण तो कसा विनातक्रार करतो आणि त्यातून बचावतो! ज्यांनी कोरोनाचा गृहपाठ केला ते आज जिवंत आहेत आणि ज्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांना आपल्या जीवाची किंमत द्यावी लागली. म्हणजेच अस्तित्व धोक्यात आलं की, माणसे प्राधान्याने ती गोष्ट करतात. मुलांनासुद्धा गृहपाठ आदेश न वाटता संदेश वाटला पाहिजे. का गृहपाठ करायचा? मला समजलं नसेल तर मी गृहपाठ करणारच ही भावना विद्यार्थ्यात रुजायला हवी. शिक्षकांनी न सांगतासुद्धा जेव्हा विद्यार्थी गृहपाठ करतील तेव्हाच विद्यार्थ्यांची गोडी अभ्यासाबाबत निर्माण होईल.
विद्यार्थ्यांना शिकवण्याचा भडिमार न करता त्यांना स्वतःहून शिकू द्या. त्यातलाच गृहपाठ हा एक भाग आहे आणि तो बंद झाला तर विद्यार्थी अभ्यासच करणार नाहीत ही भीती पालकांनी काढून टाकायला हवी. जे काही होईल ते वर्गातच आणि घरी फक्त उजळणी किंवा देखरेख पालकांनी करावी, पण विद्यार्थ्यांचे कोणतेच शैक्षणिक कार्य पालकांनी करू नये आणि विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टमध्ये अधिकांश भाग पालकांचाच असेल तर त्या प्रोजेक्टला अर्थ नाही. तसेच यादृष्टीने पालकांनी आपल्या पाल्यांना स्वयंअध्यापनाकडे, होम स्कुलिंगकडे प्रवृत्त करायला हवं. विद्यार्थ्यांना एकलव्य होऊ द्या. निसर्ग हाच मोठा गुरू असतो किंवा निसर्गातल्या अनेक गोष्टी निरीक्षणाने, अध्ययनाने मुले शिकतच असतात. फक्त त्याच्यावर पालकांची, शिक्षकांची देखरेख हवी, पण त्याला काहीच येत नाही म्हणून केवळ दमवून चालणार नाही. गृहपाठाचे शिक्षा आजही होत आहेत. या मुलांना शिक्षणापासून दूर नेत आहेत या परिस्थितीमध्ये गृहपाठाचा नव्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.
गृहपाठ अभ्यासाचा भाग न होता यांत्रिक क्रिया विद्यार्थ्याकडून होत असेल तर तो बंद झालेलाच बरा. त्यामुळे त्यांची दमछाक होणार नाही. गृहपाठ द्यायचाच असेल तर विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवणे जमणार आहे का? 25 विद्यार्थ्यांचे गृहपाठ तपासले जाऊ शकतात. रोज 80 विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या तपासणीची शिक्षकाकडून कशी अपेक्षा करणार?



























































