
फळे आरोग्यासाठी चांगली असतात. कारण त्यात पोषक घटक, जीवनसत्त्वे, क्षार, ऑण्टिऑक्सिडंट्स इत्यादी मुबलक असतात, पण फळांमध्ये असलेला फायबर हा घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो आणि त्याविषयी फार चर्चा होत नाही. त्याविषयी आयटीसीच्या न्यूट्रिशन सायन्स विभागाच्या प्रमुख डॉ. भावना शर्मा यांनी दिलेली माहिती…
फ्रूट फायबर हा वनस्पतीजन्य अन्नघटकाचा असा भाग असतो, जो शरीरात पचला जात नाही आणि संपूर्ण पचनयंत्रणेमध्ये तो बऱयापैकी जसाच्या तसा राहतो. फायबर दोन प्रकारचे असते. द्रावणीय, अद्रावणीय. द्रावणीय फायबर पाण्यात विरघळते आणि त्याने पोटात जेलसारखा एक पदार्थ तयार होतो. अद्रावणीय फायबर पाण्यात विरघळत नाही आणि विष्ठेला घनता मिळते. बहुतेक फळांमध्ये विविध प्रमाणात फायबर असतात आणि फ्रूट फायबरचे लाभ बरेच आहेत.
फळे व फळांमधील फायबर कसे मिळवावे…
आहारात फ्रूट फायबर समाविष्ट करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी सोपी पद्धत म्हणजे संपूर्ण फळ खाणे. सफरचंद, केळी, संत्री हे अल्पोपाहाराचे उत्तम पर्याय आहेत. चवपालट करण्यासाठी विविध प्रकारच्या फळांचा रस काढून त्याचे काही वेगवेगळे प्रकार करता येऊ शकतात. किंबहुना त्यात काही भाज्यांचाही रस घालता येऊ शकतो.
उदाहरणार्थ, एबीसी ज्यूसचे (सफरचंद, बीटरूट, गाजर) खूपच फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही डिटॉक्स होता, प्रतिकारक शक्ती वाढते, वजन कमी होण्यास मदत होते इत्यादी. त्याचप्रमाणे जांभळाच्या रसाने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, मधुमेह नियंत्रणात राहतो, त्वचा चांगली राहते इत्यादी लाभ होतात. मिक्स्ड फ्रूट ज्यूस प्यायल्याने एकाच वेळी अनेक फळांचे फायदे मिळतात. कलिंगडाच्या रसाने उन्हाळय़ात दिलासा मिळतोच, त्याचप्रमाणे हा रस एक उत्तम
ऑण्टिऑक्सिडंट आहे आणि त्यात अनेक दाहरोधी पोषक घटक समाविष्ट आहेत.
फायदे कोणते…
– पचन सुलभ होते. आतडय़ांमधून अन्न व्यवस्थितपणे पुढे सरकत राहते आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंध होतो.
– द्रावणीय फायबरमुळे रक्तात साखर शोषली जाण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. मधुमेहींसाठी याचा विशेष लाभ होतो.
– द्रावणीय फायबरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित होते. त्यामुळे हृदयविकाराची जोखीम कमी होते.
– वजन कमी करण्यास आणि वजन नियंत्रित राखण्यास मदत होते.
– फायबरमुळे दीर्घकाळ तुमचे पोट भरल्याची भावना असते. त्यामुळे आरोग्यास अपायकारक असलेला अल्पोपाहार खाल्ला जात नाही. पोट भरल्याची भावना असल्यामुळे कॅलरी सेवनाचे नियंत्रणही करता येते.
– या फायबरमुळे आतडय़ांमधील कोलन प्रीबायोटिक कृतीसाठी मदत करतात. असा प्रकारे फ्रूट फायबर हेल्दी मायक्रोबायोमला चालना देतात. इरिटेबल बॉले सिण्ड्रोम (आयबीएस) हा एक पोटाचा आजार आहे. आयबीएसच्या लक्षणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी फळांमधील द्रावणीय फायबर व पेक्टिनची मदत होऊ शकते.