निसर्गभान- सौंदर्यमग्न आश्विन

>> डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

सरत्या भाद्रपद आणि आश्विनात सकाळी सकाळी तरळणारे मंद-मधुर धुके एखाद्या स्वप्नासारखे सुंदर असते. आश्विनात वाऱयाच्या झुळकीवर डोलणारी हिरवीगार पसरलेली शेती आणि एक अद्भुत कोवळी सकाळ आपल्याला मंत्रमुग्ध करते. सरत्या पावसाळय़ातले हे दिवस एखाद्या कवितेसारखे असतात.

निरभ्र आकाश कोवळ्या उन्हात सकाळी झळाळत असते. मधूनच तरळतात चुकार काळे मेघ. तजेलदार उन्हात हिरव्या रंगाला एक नवेच चैतन्य असते. सरत्या पावसातील आणि भाद्रपद-आश्विनातले हे दिवस फुलपाखरांचे पंख लावून येतात. या दिवसांत हवेत एक वेगळीच सुंदर कोवळीक असते. झगमगत्या मोरपिसाऱयासारखे एक आगळे सौंदर्य निसर्गात असते.

रान ओले चिंब ओले
तुझ्या नितळ देहाला
वस्त्र लाघट लाखले

असे ओल्या रानात हिरवेपण वस्त्रासारखे असते. एक अतिशय मोहक असा नखरा या हवेत, या दिवसांतील वातावरणात असतो. आश्विनात वाऱयाच्या झुळकीवर डोलणारी हिरवीगार पसरलेली शेती आणि एक अद्भुत कोवळीक आपल्याला मंत्रमुग्ध करते. एक सुंदर ताजेपणा या हिरवेपणावर असतो. पाऊस ओसरलेला असतो आणि एखाददुसरी हलकी नाहीतर धसमुसळी सर येते तेव्हा साऱया दिशा पुन्हा पावसात हरवतात. हा असा अवखळ पाऊस इथं पडला तर तिथं नाही! खटय़ाळ असा हा पाऊस अवचित येतो आणि हिरव्यागार शेताशी दंगा-मस्ती करून जातो. एखाद्या खोडकर, निरागस, खटय़ाळ मुलाप्रमाणे बागडणाऱया या सरत्या पावसाच्या काळातील फुलपाखरांसारख्या सरी असतात. सरत्या पावसाचे दिवस हे तर फुलपाखरांचे दिवस! असंख्य रंगांची आणि असंख्य आकारांची सुंदर फुलंपाखरं गवतावर आणि शेतांवर बागडत असतात. निळी, जांभळी, पिवळी, पांढरी, तपकिरी… किती रंग आणि किती मनमोहक आकार! फुलांभोवती रुंजी घालत बागडणारी ती फुलपाखरं सकाळच्या कोवळय़ा उन्हात चमकतात आणि वाटते की, सारी सकाळच मुळी या फुलपाखरांच्या रूपाने बागडत आहे. त्यातच किणकिणणाऱया स्वरात बागडणारे इवलेसे मधुपक्षी… तांबडय़ा छातीचे, शेवाळी रंगाच्या पंखांचे, पिवळय़ा पोटांचे… फुलाफुलांवर बागेत नाचतात. सारी सकाळ त्यांच्या स्वरांनी जिवंत होते. गर्द हिरव्या रानात ही फुलपाखरे बागडत असतात आणि पाखरांचे थवे स्वच्छंदी गात घिरटय़ा घालत असतात. काळा बुलबुल झेपावत झुडपाझुडपांवर नाचत असतो. सोनपिवळा अन् पंखावर काळी झालर मिरवणारा हळद्या पक्षी गिरकी घेता घेता इतकी गोड शीळ घालतो की, सारं रान जिवंत होते. दयाल पक्ष्याचे गाणे हरवलेले असते; पण सोनसळी सकाळी गाण्याने ते स्वच्छंद बागडत असतात. सातभाईचा कर्कश चिवचिवाट तर चालूच असतो. मैना आणि साळुंख्यांचे थवे हिरव्या शेतावर गलबलाट करीत फिरत असतात. सकाळ या पक्ष्यांच्या मंदमधुर गीतात जिवंत होते. या सरत्या पाऊसकाळात दुपारचं ऊनसुद्धा कोवळं वाटतं. या उन्हाला साऱया सृष्टीच्या हिरवाईची एक अद्भुत झळाळी असते. सारे डोंगर हिरव्या रंगाने नटलेले आणि चैतन्याने न्हाऊन गेलेले असतात. वर्षभर ज्यांचे रुक्ष आणि रौद्ररूप पाहून आपण विषण्ण होतो ते डोंगर हिरव्या रंगाच्या अनेक छटा मिरवत लोभस आणि राजस रूप धारण करून उन्हात नहात असतात. ऊन-पावसाच्या पाठशिवणीत आणि पाखरांच्या गाण्यात हरवून गेलेले असतात. डोंगरांचे या काळातले सौंदर्य अतिशय मंत्रमुग्ध करणारे असते. सह्याद्रीच्या रांगांमधील रानात भटकायला असे हे दिवसच खूप मजेचे असतात. एक अद्भुत असा आल्हाद, आनंद त्या सृष्टीत सतत जाणवत असतो. सरत्या भाद्रपद आणि आश्विनात सकाळी सकाळी तरळणारे मंद-मधुर धुके एखाद्या स्वप्नासारखे सुंदर असते. या धुक्यातून सोनेरी पहाट उगवते आणि धुके मावळते; पण पहाटेचे हे नितांत सुंदर धुके एखाद्या भावगीताप्रमाणे आपल्या मनात रेंगाळत राहते. थंडीतील धुके आणि हे सरत्या पावसाळय़ातील धुके यात फरक असतो. आश्विनातील धुके हलके आणि तरल असते. त्यातच एखादी हलकीशी सर येऊन जाते. सोनेरी ऊन या धुक्यात उतरत झाडाझाडांना चैतन्याचा स्पर्श करते. आश्विन आणि कार्तिकातील पहाटही बासरीच्या सुरासारखी मंद-मधुर आणि फुलपाखरांसारखी तरल असते. अथांग पसरलेल्या भाताचा आणि गवताचा मत्त करणारा सुगंध साऱया हवेत दरवळत असतो. सरत्या पावसाळय़ातले हे दिवस एखाद्या कवितेसारखे असतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या