
रा. ना. गोडबोले (सार्वजनिक) ट्रस्ट व सातारकर नागरिकांच्या वतीने आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने सातारा जिह्याचे नाव उज्ज्वल करणाऱया व्यक्तीला प्रतिवर्षी ‘सातारा भूषण पुरस्कारा’ने गौरवले जाते. सन 2022 सालचा पुरस्कार ‘प्राज इंडस्ट्रीज’चे डॉ. प्रमोद चौधरी यांना शनिवारी प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे 32 वे वर्ष आहे.
यापूर्वी प्रा. शिवाजीराव भोसले, डॉ. नरेंद्र दाभोलकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बाबामहाराज सातारकर, ललिता बाबर, गुरुवर्य बबनराव उथळे, सयाजी शिंदे, चेतना सिन्हा अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
भावी काळाची पावले ओळखत बायो फ्युएल्स व बायो केमिकल्स समाविष्ट बायो इकॉनॉमी क्षेत्र निवडून त्यात आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवलेले व इथेनॉल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. प्रमोद चौधरी यांनी प्राज हे नाव जगभरातील पाचही खंडात पोहोचवले. साखर कारखान्यात लागणारी डिस्टिलरी उभारणी, सांडपाणी शुद्धीकरण, मळी व वाया गेलेल्या धान्यापासून जैवइंधन असे प्रकार त्यांनी संशोधनातून विकसित केले. डॉ. चौधरी त्यांचे शालेय शिक्षण साखरवाडी (ता. फलटण) येथे झाले.
शनिवारी (दि. 24) सायंकाळी समर्थ सदन येथे पुरस्कार प्रदान सोहळा आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

























































