डेक्कन क्वीनमध्ये कोचमध्ये डॉक्टर नियुक्त करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी बोलणार, नाना पटोले यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेक्कन क्वीनच्या लोणावळा स्थानकात चढलेल्या एका प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने याप्रकरणात वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वेच्या बोगीत डॉक्टर तैनात असावा यासाठी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘डेक्कन क्वीन’च्या डब्यांवर नागझिरा पक्षी व निसर्ग साकारला असल्याने त्याची पाहणी करण्यास आलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी डेक्कनच्या प्रवाशाच्या मृत्यूबद्दल विचारले असता त्यांनी रेल्वेच्या बोगीत डॉक्टर तैनात करण्यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी बोलणार असल्याचे स्पष्ट केले.

डेक्कन क्वीनमध्ये लोणावळा येथे चढलेले पन्नास वर्षीय प्रवासी जैन यांचा मंगळवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवाशाला वैद्यकीय मदत मिळण्यासाठी सुरक्षा चेन खेचण्यात आली. परंतू गाडी पुढे गेल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. जैन यांना तीव्र झटका आल्याने त्यांचा गाडीतच मृत्यू झाला. खंडाळा स्टेशन मास्तरांकडे त्यांचा मृतदेह सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.