
लष्करातील महिलांसाठी 2020 हे संस्मरणीय वर्ष ठरलं आहे. कारण, याच वर्षी लष्करी दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व प्रथमच तानिया शेरगील या महिला लष्करी अधिकाऱ्याने केलं होतं. याच वर्षी लष्करात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना स्थान मिळावं, यासाठीचा एक दीर्घकालीन लढा महिलांनी सर्वोच्च न्यायालयात जिंकला. त्या पार्श्वभूमीवर मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर या महिला अधिकाऱ्याला लेफ्टनंट जनरल या पदावर बढती मिळाली आहे. या बढतीमुळे डॉ. कानिटकर या उच्च पदावर पोहोचलेल्या पहिल्या मराठी महिला अधिकारी ठरल्या आहेत.
2019मध्येच त्यांची निवड या पदासाठी झाली होती. मात्र हे पद रिक्त झालं नव्हतं. शनिवारी हे पद रिक्त झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. बालरोगतज्ज्ञ असलेल्या माधुरी यांनी लष्करात 37 वर्षं सेवा केली आहे. नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे. लष्कराच्या तिन्ही सेवांविषयी सल्ला देण्याचे काम यापुढे माधुरी करणार आहेत. कानिटकर यांचे पती राजीव लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. एका पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे.
माधुरी कानिटकर पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी असून त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी बालरोग विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. 2017 मध्ये त्या पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या पहिल्या अधिष्ठाता होत्या. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी उधमपूर येथे मेजर जनरल (वैद्यकीय) पदाची जबाबदारी स्वीकारली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातून बालकांच्या मूत्रपिंड विकारांवर उपचाराचे प्रशिक्षण घेतले आहे. त्या लष्करी दलातील पहिल्या प्रशिक्षित बाल मूत्रपिंडविकार तज्ज्ञ आहेत. पुणे आणि दिल्लीत त्यांनी मुलांच्या मूत्रपिंड विकारावर उपचारासाठी केंद्रे स्थापन केली आहेत.




























































