
- डॉ. मंजिरी भालेराव
प्राचीन हिंदुस्थानातील अनेक वैभवशाली नगरं आज वेगळ्या अवस्थेत आहेत. अतिशय वैभवशाली इतिहास असलेल्या अशा अनेक शहरांचा आता मागमूसही पाहायला मिळत नाही किंवा त्यांचे लहानशा खेडय़ात रूपांतर झालेले असते. महाराष्ट्रातील अशा महत्त्वाच्या प्राचीन शहरांसंबंधी ही लेखमाला. आज वेध घेऊया नेवासा अर्थात निधीवास या नगरीचा.
सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विद्ग्धपरिषत् ताः चान्द्रबिम्बाननाः
उत्त्सिक्तः स च राजपुत्रनिवहः
ते बन्दिनः ताः कथा ः
सर्व यस्य वशात् अगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नमः
(वैराग्यशतक – भर्तृहरी)
ती महान नगरी, तो महान राजा, त्याचे चक्रवर्ती साम्राज्य, मोठाले सामंत त्याच्या सभेत नम्रपणे बसलेले दिसत. त्या (तिथे) चन्द्रबिंबासारख्या सुंदर युवती होत्या, त्याचे उन्मत्त असे राजपुत्र होते. त्याची स्तुती करण्यासाठी कित्येक भाट, कवी इ. होते. ते सर्व ऐश्वर्य आता फक्त स्मृतींच्या स्वरूपात उरले आहे हे सगळे घडवणाऱ्या त्या काळाला माझा नमस्कार असो !
प्राचीन हिंदुस्थानातील अनेक नगरींची अशी अवस्था आपण पाहत आलो आहोत. अतिशय वैभवशाली इतिहास असलेल्या अनेक शहरांचा आता मागमूसही पाहायला मिळत नाही किंवा त्यांचे लहानशा खेडय़ात रूपांतर झालेले असते. महाराष्ट्रातील अशा महत्त्वाच्या प्राचीन शहरांसंबंधी ही लेखमाला आजपासून सुरू करीत आहोत.
यामध्ये असेच एक खूप महत्त्वाचे शहर म्हणजे नेवासा. अगदी प्रागैतिहासिक काळापासून ते ऐतिहासिक काळापर्यंत सलग वसाहतींचे अवशेष मिळालेली ही नागरी. संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी हे एकेकाळी एक समृद्ध असे नगर होते. कल्याण ते प्रतिष्ठान (पैठण) या अतिशय गजबजलेल्या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे स्थान होते. आज हे एक पुण्यक्षेत्र म्हणून ओळखले जाते. प्रवरा नदीच्या तीरावर हे गाव वसले आहे. ‘गोदास्नान आणि प्रवरापान’ अशी एक म्हण आहे. तिचा उगम नेवासा या गावाशी संबंधित पुराणकथेशी आहे. पूर्वी हे गाव क्षीरसागराच्या तीरावर होते. अमृतमंथनानंतर विष्णूने मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत वाढायला सुरुवात केली. सगळ्यांना फसवून राहूनेसुद्धा थोडे अमृत मिळवले. हे जेव्हा विष्णूच्या लक्षात आले तेव्हा त्याने सुदर्शन चक्राचे आवाहन करण्यासाठी अर्धे रूप विष्णूचे आणि अर्धे नारीचे म्हणजे महालयाचे घेऊन राहूचा शिरच्छेद केला. त्यानंतर तो तिथे महालया आणि मोहिनीराज असे एकत्र रूप घेऊन राहिला. राहूचा शिरच्छेद होत असताना अमृताचे काही थेंब प्रवरेत पडले म्हणून नेवासे येथील प्रवरा नदीला अमृतवाहिनी म्हणतात. इथले तिचे पाणी तिच्या इतर ठिकाणच्या पाण्यापेक्षा गोड लागते असे सांगितले जाते.
स्कंदपुराणातील महालय माहात्म्यात अशी कथा येते की, ब्रह्मदेवाच्या वरामुळे उन्मत्त झालेल्या तारकासुराने देवांना स्वर्गातून हाकलून दिल्यावर विष्णूने त्या सर्वांना या क्षेत्रात वसती करायला सांगितली. त्यामध्ये नेवाशाचे नाव ‘महालय’ आणि ‘निधीनिवास’ असे आलेले दिसते. तसेच प्रवरेचे नाव ‘वरा’ आणि ‘पापहरा’ असे दिसते. महत्त्वाच्या देवता इथे राहिल्यामुळे याचे नाव ‘महालय’ असे पडले, तर कुबेर आपल्या नवनिधींना घेऊन इथे वास्तव्यास आल्यामुळे या गावाला ‘निधीनिवास’ असे नाव पडले असेही मानले जाते. ‘निधीनिवास’चे पुढे ‘निवास’ आणि त्याचे पुढे ‘नेवासा’ असे नाव तयार झाले. इथे आज एकमेवाद्वितीय असे ‘महालया’ आणि ‘मोहिनीराज’ यांचे मंदिर आहे. एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून या गावाचा आज नावलौकिक आहे. नेवासा या गावाची प्रसिद्धी अजून एका कारणामुळे आहे आणि ते म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’चे जन्मस्थान. याच गावात एक खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ची निर्मिती केली. आजही तो खांब लोक दाखवतात. माघ महिन्यात मोहिनी राजाची तर फाल्गुन महिन्यात ज्ञानेश्वर स्तंभाची यात्रा निघते. ज्ञानेश्वर मंदिराच्या जवळच एक लाडमोड नावाची टेकडी आहे. तिथे डेक्कन कॉलेज या संस्थेने 1954 साली उत्खनन करायला सुरुवात केली. या उत्खननातून महाराष्ट्राच्या पुरातत्त्वाचे एक नवीनच दालन उघडले गेले. डॉ. ह. धी. सांकलिया या जगप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्खनन पार पडले. प्रागैतिहासिक काळ ते ऐतिहासिक काळ यामधला सलग सांस्कृतिक कालक्रम यामुळे उजेडात आला. साधारणपणे दीड लाख वर्षांपासून माणूस या परिसरात राहत होता हे सांगणारे पुरावे या उत्खननातून पुढे आले. त्या काळातल्या मानवाने बनवलेली दगडाची विविध प्रकारची हत्यारे, थोडी नंतरच्या काळात बनवलेली लहान आकाराची रंगीत दगडांपासून बनवलेली टोकदार पाती असलेली हत्यारेही सापडली आहेत. या लाडमोड टेकाडावर साधारणपणे इ.स. पूर्व 1500 च्या आसपास ताम्रपाषाणयुगीन लोकांची वसाहत झालेली लक्षात आली. नंतर आद्य ऐतिहासिक काळात म्हणजे इ.स. पूर्व तिसरे शतक या काळापासून ते एकदम मध्ययुगापर्यंत म्हणजे इ.स. च्या 16 व्या ते 17 व्या शतकापर्यंत याच ठिकाणी आणि आसपासच्या भागात सलग वसाहतीचे अवशेष मिळाले. इ.स. पूर्व 1500 च्या आसपासचा काळ हा महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांचा काळ होता. तांबे, ब्राँझ या धातूंपासून विविध हत्यारेसुद्धा या काळात बनवली गेली. त्याचबरोबर दगडी हत्यारांचाही वापर चालूच होता. अनेक प्रकारचे नक्षीकाम असलेली खापरे तसेच मोठाले रांजण इथे सापडले आहेत. या खापरांवरील नक्षीकामात उल्लेखनीय खापर आहे ते म्हणजे एकामागून एक धावणाऱ्या हरिणांचे चित्र असलेले एक खापर. त्या काळात लहान मुलांच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर राखी रंगाच्या मोठय़ा मडक्यात पुरत असत. दोन मडकी तोंडाला तोंड लावून पुरलेली 131 दफने उत्खननात सापडली आहेत. त्यापैकी 125 लहान मुलांची तर पाच मोठय़ा माणसांची होती. ती सर्व उत्तर-दक्षिण ठेवलेली होती.
यानंतरचा महत्त्वाचा कालखंड म्हणजे अंदाजे इ.स.पूर्व तिसरे शतकानंतरचा. याला आद्य ऐतिहासिक काळ असेही म्हणतात. या काळातील लोकांच्या वस्तीचे भरपूर मोठय़ा प्रमाणात पुरावे मिळाले आहेत. लोखंड, दगड, विटा अशा विविध प्रकारच्या साहित्याचा उपयोग करून हे लोक आपली घरे बांधत होते. या वसाहतीत मौर्य काळात मिळणारी सुप्रसिद्ध अशी काळ्या रंगाच्या झिलईची (Northern Black Polished Ware) खापरेही मिळाली आहेत. तसेच रंगीत दगडांचे मणी, तांब्याच्या, शंखांच्या बांगडय़ा, पाटे – वरवंटे, काजळ लावण्यासाठी अंजनशलाका, बाणाग्रे, ताटे, डाव, हस्तिदंती कंगवे, मातीची खेळणी, परदेशी बनावटीची भांडी तसेच दालनाची जाती, मद्यकुंभ म्हणून वापरले जाणारे ऍम्फोरा, नागाचे शीर्ष असलेला सोन्याचा मणी, शंखाच्या बांगडय़ा आणि कानातले तसेच सातवाहनांची नाणीसुद्धा सापडली आहेत. हा काळ म्हणजे हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या भरभराटीचा काळ होय. युरोपमधून समुद्रमार्गे येणारा माल पश्चिमी किनाऱ्यावर उतरवून पुढे हिंदुस्थानातील अनेक महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांना पाठवला जात असे. त्यामध्ये पैठण या अतिशय महत्त्वाच्या केंद्राचाही समावेश होता. पैठणला जाणारा हा मार्ग नेवाशावरून जात असे. या व्यापारात या नगरीचाही सहभाग होता. त्यामुळे आलेल्या समृद्धीचे काही अवशेष उत्खननातून समोर आले आहेत. परदेशी लोकांशीसुद्धा इथल्या रहिवाशांचा संपर्क आला असणार हे उघडच आहे. अत्यंत भरभराटीच्या या कालखंडानंतर मध्ययुगातील वसाहतींचेही अवशेष इथे मोठय़ा प्रमाणावर सापडले आहेत. याच काळाच्या सुरुवातीला इथे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे संत ज्ञानेश्वर इथे आले आणि त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ची रचना केली. ज्याअर्थी ते या गावात आले त्याअर्थी इ.स. 13 व्या शतकात नेवासा हे एक चांगले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र किंवा व्यापारी केंद्र असले पाहिजे. त्या काळातील नेवाशाचे आज स्पष्ट स्वरूप समजत नसले तरी ज्ञानेश्वरांनी ग्रंथरचनेसाठी हे ठिकाण निवडल्याने आपोआपच त्याचे स्थानमाहात्म्य सिद्ध होते. आज या नेवासा नगरीचे प्राचीन वैभव जरी विस्मृतीत गेले असले तरी पौराणिक कथा, मौखिक परंपरा, साहित्यिक पुरावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरातत्त्वीय उत्खननातून उजेडात आलेले खूप प्राचीन काळापासूनचे अवशेष हे सर्व या कोणेएकेकाळी रम्य असलेल्या नगरीची साक्ष देतात! ते प्राचीन वैभव आणि तिचे आजचे बदललेले स्वरूप पाहता आपण एवढेच म्हणू शकतो- कालाय तस्मै नमः !
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत.)
Twitter – [email protected]



























































