
>> डॉ. पृथ्वीराज देशमुख
संसर्गजन्य संधिवात याला सेप्टिक संधिवात असेही म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे, जी उद्भवते जेव्हा एखाद्या सांध्याला जिवाणू, विषाणू किंवा बुरशीसारख्या सूक्ष्म जीवांमुळे संसर्ग होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास वेदना आणि अशक्तपणासारख्या पारी उद्भवू शकतात. या स्थितीचे शारीरिक गतिशीलता व जीवनाच्या एकूण गुणवत्तेवरही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
सांध्यामधील विकृती : संसर्गजन्य संधिवाताचे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. संसर्गामुळे सांध्यामध्ये जळजळ होते, ज्यामुळे कूर्चा आणि हाडांचे नुकसान होते. तसेच हाडांसंबंधी विकृती निर्माण होऊ शकते व त्यांच्या कार्यात अडथळे येऊ शकतात. कालांतराने सुरळीतपणे हालचाल करण्याची आणि वजन सहन करण्याची सांध्याची क्षमता कमी होत जाते.
वेदना आणि अस्वस्थता : दीर्घकालीन वेदना आणि अस्वस्थता हे संसर्गजन्य संधिवातांचे सामान्य परिणाम आहेत. संसर्गामुळे सतत सांध्यामध्ये जळजळ, तीव्र वेदना होऊ शकते, ज्याचा दैनंदिन कार्यावर परिणाम होतो आणि जीवनाची गुणवत्ता कमी होते.
हालचाल मंदावणे : संसर्गजन्य संधिवातामुळे सांध्यामध्ये कडकपणा येतो आणि हालचालींवर मर्यादा येते. जळजळ आणि सांध्यांना झालेल्या नुकसानीमुळे ऊतींवर डाग तयार होतात.
सौम्य संधिवात : काही प्रकरणांमध्ये संसर्गजन्य संधिवात सौम्य ऑस्टियोआर्थ्रायटिसच्या वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. याचा प्रारंभिक संसर्ग कूर्चासह सांध्यांच्या ऊतींचे विघटन करते. कालांतराने ऑस्टियोआर्थ्रायटिसच्या होऊ शकतो. ऑस्टियोआर्थ्रायटिसमुळे सांधेदुखी वाढू शकते, सांध्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि सांध्याचे व्यवस्थापन आणखी गुंतागुंतीचे ठरू शकते.
अशक्तपणा : सांध्यांचे झालेले नुकसान, वेदना, हालचालींवर येणाऱ्या मर्यादा आणि विकृती यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो. संसर्गजन्य संधिवात असलेल्या व्यक्तींना कपडे घालणे, आंघोळ आणि स्वयंपाक करणे अशा दैनंदिन कामामध्ये अडचणी जाणवू शकतात.
मानसिक परिणाम : संसर्गजन्य संधिवाताचे दीर्घकालीन परिणाम एखाद्या व्यक्तीच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. तीव्र वेदना, शारीरिक हालचालींवर येणाऱ्या मर्यादा आणि काही अंशी येणारे अपंगत्व यामुळे भीती, चिंता आणि नैराश्याची भावना येऊ शकते. काही व्यक्ती स्वत:ची ओळखदेखील गमावू शकतात.
पुन्हा होणारा संसर्ग : यशस्वी उपचाराने तीव्र संसर्गावर मात करता येते, परंतु काही प्रकरणांमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो. रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य, संबंधित व्यक्तीची आरोग्य स्थिती आणि कृत्रिम सांधे यांसारखे घटक वारंवार होणाऱ्या पांमणास कारणीभूत ठरू शकतात. पुन्हा होणारे पांमण हे सांध्याचे नुकसान करते.
प्रतिबंध आणि व्यवस्थापन : संसर्गजन्य संधिवातांचे दीर्घकालीन परिणाम रोखण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. सांध्याचे नुकसान कमी करण्यासाठी सुरुवातीच्या संसर्गावर वेळीच आणि योग्य उपचार करणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय सल्ल्याने प्रतिजैविक, अँटिव्हायरल किंवा अँटिफंगल औषधांचे सेवन करावे. संसर्गानंतर पुनरावृत्ती किंवा गुंतागुंतीची कोणतीही चिन्हे शोधण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. फिजिओथेरपी सांध्याचे कार्य सुरळीत राखण्यासाठी, स्नायूंमधली ताठरता कमी करण्यासाठी आणि स्नायूंना बळकटी आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जीवनशैलीतील बदल, वजन नियंत्रित राखणे आणि व्यायाम करणे हे सांध्यावरील ताण कमी करण्यास मदत करू शकतात. संसर्गजन्य संधिवातांचे दीर्घकालीन परिणाम हे गुंतागुंतीचे असू शकतात. सांधे कमकुवत होणे, तीव्र वेदना, हालचालींवर मर्यादा येणे आणि मानसिकरीत्या खचून जाणे अशा काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. संधिवाताचा सांध्यांच्या आरोग्यावर आणि एकूणच जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि त्याकरिता व्यवस्थापन, अचूक उपचार आवश्यक आहे.
(लेखक नेक्सस डे सर्जरी सेंटर, मुंबई येथे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत)




























































