…तर घर आनंदवन होईल, डॉ. रवींद्र जोशी यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुटुंब टिकली तर संस्कार आणि संस्कृतीचा प्रवाह अखंडपणे वाहत राहील.कुटुंबातील वातावरण बदलायचे असेल तर भजन,भोजन,संयम आणि संवाद या चार सुत्रांचा उपयोग प्रत्येक कुटुंबाने करावा. प्रत्येक कुटुंबात आठवड्यात एकदा सत्संग व्हावा, कुटुंबातीलि सर्व सदस्यांचे दिवसातले एक जेवण एकत्र व्हावे,त्यावेळी दिवसभरातील घटनांवर संवाद व्हावा आणि वागण्या बोलण्यात संयम ठेवला तर प्रत्येक घर आनंदवन होईल असे प्रतिपादन कुटुंब प्रबोधन मंचाचे अखिल भारतीय सहसंयोजक डॉ.रविंद्र जोशी यांनी व्यक्त केले.

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. रविंद्र जोशी यांचे ‘कुटुंब प्रबोधन’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. या ऑनलाईनरित्या पार पडलेल्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात दर्शक उपस्थित होते.

डॉ. रविंद्र जोशी पुढे म्हणाले की, आजच्या चंगळवादी जगात आपली कुटुंब व्यवस्था खिळखिळी होत आहे. घर ज्याप्रमाणे केवळ भिंतींनी साकारत नाही,तसेच कुटुंब हे सुध्दा केवळ नात्यांनी बांधले जात नाही.त्यासाठी कुटुंबात सौहार्दाचे, आत्मियतेचे वातावरण असावे लागते. कुटुंब हे देवालय,विद्यालय,आदरालय आणि सेवालय झाले तरच जीवनात सुख,शांती आणि समाधानाची अनुभूती आपण घेऊ शकू.त्यासाठी प्रत्येकाने आत्मियता,ज्ञान,कर्तव्य आणि संस्कार या चार तत्वांचा अवलंब केला पाहीजे,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे नेटके संचालन अस्मिता आपटे यांनी तर मान्यवरांची ओळख आणि कार्यक्रमाचे समयोचित प्रास्ताविक आरती देव यांनी केले. उज्ज्वला शेट्ये यांनी सहसंयोजन केले.