धर्म याचा अर्थ कर्तव्यकर्म!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. साहेबराव निगळ

धर्म म्हणजे कर्तव्यकर्म होय. आपापल्या योग्यतेनुसार मिळालेले कर्म प्रामाणिकपणे अर्थात कर्तव्यनिष्ठतेने वा कर्तव्यभावनेने करणे हा नियम सर्वांना लागू आहे. त्यामुळे ऊर्ध्वगामी गतिशीलतेला चालना मिळेल. शेकडो वर्षांचा अन्याय दूर होईल. आजपर्यंतच्या विविध क्षमता असलेल्या उपेक्षित एकलव्यांना न्याय मिळेल. परिणामतः सामाजिक न्याय हे मूल्य साकारित होईल.

जगात एकूण अधिकृत असे बारा धर्म आहेत. प्रत्येक धर्मात अनेक संप्रदाय पंथ व उपपंथ आहेत. या 12 धर्मांपैकी चार धर्म हिंदू, बौद्ध, जैन व शीख हे हिंदुस्थानात जन्माला आलेले आहेत. मुख्य म्हणजे बाराही धर्म हे आशिया खंडात निर्माण झालेले आहेत. या 12 पैकी तीन धर्म यहुदी, ख्रिश्चन व इस्लाम हे सेमेटिक (semetic religious) म्हणून प्रसिद्ध आहेत. कारण ते एकाच मानववंशात (semite) निर्माण झाले. या तीन धर्मांपैकी इस्लाम व ख्रिश्चन हे दोन धर्म आक्रमक धर्मांतरवादी आहेत. त्यांच्या धर्मगुरूंचा इतर समाजातील व धर्मातील लोकांना आपल्या धर्मात आणण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर आहे. म्हणून ख्रिश्चन व इस्लाम या धर्मांच्या अनुयायांची संख्या इतरांपेक्षा जास्त असून त्या संख्येत वाढ होत आहे हे एक ऐतिहासिक सत्य आहे.

हिंदुस्थानातील मुसलमानांमध्ये व ख्रिश्चनांमध्ये बहुसंख्य लोक हे हिंदू समाजातील धर्मांतरित मुसलमान व ख्रिश्चन आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मध्यंतरी सांगितले की, हिंदुस्थानी मुसलमानांचा व ख्रिश्चनांचा DNA (डीएनए) एकच आहे. असे का झाले? मध्यंतरी एका कार्यक्रमात मोहन भागवत बोलले की, ब्राह्मणांनी पापक्षालन केले पाहिजे. जन्मनिष्ठ जातीव्यवस्था व जातीभेदासमोर गेले पाहिजेत, हे त्यांचे विधान स्वागतार्ह आहे. उशिरा का होईना, सरसंघचालकांनी हे विधान केले ही फार चांगली बाब आहे. विवेकनिष्ठ समाज परिवर्तनाला पोषक आहे. या सरसंघचालकांच्या विचाराला पहिला विरोध अखिल भारतीय ब्राह्मण संघाच्या प्रमुखांनी केला. मात्र अशा काही मतांना भीक न घालता भागवतांनी आपले विचार सामाजिक विचारमंचावर मांडलेच पाहिजेत. ते जितक्या हिरीरीने व प्रामाणिकपणे आपले मत लोकांसमोर मांडतील तितका त्यांना समाज पाठिंबा देईल व हिंदू धर्माची (वैदिक धर्माची) उज्ज्वल तत्त्वे लोकांसमोर येतील. परिणामतः समतेचा व न्यायाचा झेंडा डौलाने फडकेल. हिंदू समाज अधिक एकसंध व बलशाली बनेल. त्याचा फायदा जागतिक समाजालाही होईल.

कोणाच्याही धार्मिकतेचा सर्वात महत्त्वाचा व मूलगामी असा गुणधर्म म्हणजे प्रामाणिकपणा (Penetrating sincerity- White hed). जन्मनिष्ठ जातीश्रेष्ठता म्हणजे काहीही न करता विशिष्ट जातीने स्वतःला धर्माच्या नावे व देवाच्या नावे लाटलेल्या सवलती, विशेष अधिकार (Privilege) आहेत. ते गेले तर समतेचे युग येऊ शकते. धर्म म्हणजे कर्तव्यकर्म होय. आपापल्या योग्यतेनुसार मिळालेले कर्म प्रामाणिकपणे अर्थात कर्तव्यनिष्ठतेने वा कर्तव्यभावनेने करणे हा नियम सर्वांना लागू आहे. त्यामुळे ऊर्ध्वगामी गतिशीलतेला (upward mobility) चालना मिळेल. शेकडो वर्षांचा अन्याय दूर होईल. आजपर्यंतच्या विविध क्षमता असलेल्या उपेक्षित एकलव्यांना न्याय मिळेल. परिणामतः सामाजिक न्याय हे मूल्य साकारित होईल.

जे लोक या गोष्टीला विरोध करीत आहेत. वणवर्चस्वाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भलामण करीत आहेत, त्या लोकांनी धर्माच्या क्षेत्रात कोणते दिवे लावले हेही त्यांनी जनताजनार्दनाला सांगावे. धर्माची व धर्माच्या इतिहासाची प्रामाणिक चिकित्सा व्हायलाच हवी. त्यामुळे खरा धर्म उजळून निघेल. आज पर्यंत सोन्याचा मुलामा दिलेल्या तथाकथित धर्माचे पितळ उघडे पडेल. ऋषीप्रणित व संतकथित धर्मच टिकेल. आजच्या कर्मकांडप्रधान व काल्पनिक मिथकांचा धर्म मागे पडेल आणि वैदिक धर्माची पताका पुन्हा उंचावेल.
ज्या दिवशी आमचे पारंपरिक धर्मगुरू त्यांच्या पूर्वजांच्या व आपल्या स्वतःच्या चुका कबूल करतील, त्या दिवशी विवेकनिष्ठ व मूल्याधारित हिंदू समाज परिवर्तन, प्रतिष्ठा व गती प्राप्त होईल. समाजात भावनिक एकात्मतेला खरी सुरुवात होईल. औपनिषदिक तत्त्वज्ञान व संतांचे विचार त्याला तात्त्विक आधार देतील. यासंदर्भात ईशावास्योपनिषदातील सद्विचार फारच उचित व मोलाचे आहेत. हे उपनिषद शुद्ध वेद आहे. त्याच्या वैदिकत्त्वाविषयी विद्वानांमध्ये, वेद प्रामाणिक मानणाऱयांमध्ये मतभेद नाहीत. या उपनिषदात वैदिक धर्माची पर्यायाने हिंदू धर्माची तात्त्विक बैठक पाहावयास मिळते. महात्मा गांधीजींना जेव्हा या उपनिषदांविषयी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी विनोबाजींकडून त्याचे भाषांतर करून घेतले व त्यावर भाष्यही लिहावयास सांगितले. आश्चर्य म्हणजे शिर्डीच्या साईबाबांनीही गेल्या शतकातील 10 व्या दशकात श्री दासगणू महाराजांना ईशावास्योपनिषदाचे भाषांतर करण्यास सांगितले व ते छापूनही आणले. याच कालावधीत केरळमधील महान प्रबोधनकार आणि धर्म व समाज सुधारक नारायण गुरु यांनीही ईशावास्योपनिषदाचे मल्याळममध्ये भाषांतर केले होते. यासंदर्भात स्वामी चिन्मयानंद यांची आठवण होते. 1952 साली या तरुण वेदांती संन्याशाचे पहिलेच सार्वजनिक व्याख्यान पुण्यात झाले. व्याख्यानाचा विषय होता, ‘चला आपण हिंदू बनूया!’ (a let us be Hindus). पुढे जाऊन एकदा ते म्हणाले होते ः My mission is to convert Hindus to Hinduism. या दोन विधानांचा अन्वयार्थ काय होतो? हिंदूंना हिंदू धर्माविषयी व वैदिक धर्माविषयी काहीही माहीत नाही. करोडो हिंदू असे अज्ञानात कोणी का ठेवले होते? आमच्या गावोगावी असलेल्या पुरोहितांनी धर्माची मूल तत्त्वे समाजाला का शिकविली नाहीत? हाही एक संशोधनाचा व चिंतनाचा विषय आहे.

गेल्या शतकातील (1894- 1994) कांची कामकोटी येथील महान शंकराचार्य श्री चन्द्रशेखरानंद सरस्वतींनी या अज्ञानासाठी व विपरीत ज्ञानासाठी अधिकृत धर्मगुरूंना जबाबदार धरले आहे. म्हणून हिंदू धर्माची खरी चिकित्सा होणे गरजेचे आहे.