संस्कृतायन – सुभाषितांची उधळण

>> डॉ. समीरा गुजर जोशी

कु मारसंभवातील काही सुंदर प्रसंग आपण पाहत आहोत. नवरात्रीचे चैतन्य अजून मनात उत्फुल्ल आहे म्हणून वाटले की, माला पार्वतीच्या साधनेचे जे नितांत सुंदर वर्णन कविकुलगुरू कालिदासाने केले आहे त्याचा आजच्या लेखात आस्वाद घेऊ या. पार्वतीच्या डोळ्यांसमोर मदन भस्म झाला. त्याचबरोबर एक युवती म्हणून तिचा अहंकारही जळून राख झाला. तिचे सौंदर्य शिवाला जिंकू शकले नाही. एका त्रैलोक्य सुंदरीसाठी ही केवढी मानहानीची गोष्ट होती, पण पार्वती यातून सावरली ते शहाणपण घेऊन. हे बाह्य सौंदर्य शिवाला जिंकू शकणार नाही. त्यासाठी कठोर तपसाधना हवी हा तिचा निश्चय झाला. हे कळल्यावर आई-वडील तर व्यथित होणारच.

पार्वती मुळातच इतकी सुकुमारी. आजवर हिमालयाची कन्या म्हणून लाडाकोडात वाढलेली. ती तप करण्यासाठी वनात जाते असे म्हणू लागली आणि तिची आई मेनावती
कुमारसंभव हे महाकवी कालिदासांनी रचलेले संस्कृतमधील एक प्रसिद्ध महाकाव्य. शंकर-पार्वती यांचा पुत्र कार्तिकेयाची जन्मकथा सांगणारे हे काव्य. काव्याच्या सुरुवातीच्या भागात कालिदासाने पार्वतीने शंकराच्या प्राप्तीसाठी केलेल्या साधनेचे नितांत सुंदर वर्णन केले आहे. त्याचे रसग्रहण करणारा हा लेख.

हळहळून म्हणाली, “लाडके, अगं इतके कष्ट कसे सहन होतील तुला. शिरीषाचे नाजूक फूल असते ना तशी तू. ते फूल भ्रमराचे नाजूक पाय कसेबसे तोलते. सहन करते, पण उद्या एखादा पक्षी त्याच्यावर बसू पाहेल तर ते फूल ते ओझे पेलू शकेल का? त्याच्या नाजूक पाकळ्या कुठच्या कुठे विखरून पडतील.” पण पार्वतीचा निश्चय अभंग राहिला. पित्याची अनुमती घेऊन ती हिमालयाच्या एका शिखरावर तप करण्यासाठी गेली.

तिचे तपाचरण पराकोटीचे होते. त्याचे फार सुंदर चित्र कालिदास आपल्यासाठी रंगवतात. ऊन-थंडी-पाऊस कशाचीही ती तमा बाळगत नाही. इथे एक सुंदर श्लोक येतो की, रात्रीच्या वेळी वादळी वारे वाहत असताना आणि धुवाधार पाऊस पडत असतानाही ती उघड्यावर एका शिलाखंडावर झोपत असे. तेव्हा वीज चमकते म्हणजे जणू रात्र डोळे चोळून खातरजमा करत असे की, इतके कठोर तप कोणी करू शकते ? आपसूक पडणारे पावसाचे पाणी आणि डोळ्यांनी ज्यांचा आस्वाद घ्यायचा अशी चंद्रकिरणे हा जणू तिचा आहार झाला होता. योगसाधना करणारे योगीही झाडांची पाने खाऊन गुजराण करणे ही साधनेची परिसीमा मानतात, पण ही तर पर्णही खात नसे म्हणून तर ती ‘अपर्णा’ ठरली. पण हे सारे आता जणू नित्याचे झाले असताना त्या तपोभूमीत एके दिवशी काहीतरी वेगळे घडले. कोणी एक तरुण तपस्वी तेथे आला. अतिथी सत्कार हे कर्तव्यच असल्याने मृदू स्वभावाच्या पार्वतीने त्याचे स्वागत केले आणि मग रंगला ‘उमा-बटू संवाद’, कालिदासाच्या लेखणीतून अवतरलेला अप्रतिम प्रसंग आहे. विविध रसांची येथे उधळण होते आहे. कालिदासाची लेखणी आपल्याला गुंगवून ठेवते आणि सहजपणे सुभाषितांची उधळण करते.

आज विविध व्यायामशाळांमध्ये बोधवाक्य लिहिलेले आढळते, ‘शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम्’ ते याच संवादात येते. संवाद कौशल्ये किंवा सॉफ्ट स्किल्स यांच्याविषयी आज आपण इतके बोलतो, पण या कौशल्याचे नियम, त्यातील पारंगतता ही भगवान शिवांकडून शिकावी. कारण बटू वेशात तेच तर पार्वतीला भेटायला आले आहेत. तिला बिचारीला याची कल्पनाही नाही. परस्परांना सर्वस्वी अनोळखी असे दोघे एकमेकांशी बोलणार आहेत. अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो आइस ब्रेकर नाही का ? स्वागताच्या ‘फॉर्मेलिटीज’ तर झाल्या. आता संभाषणाला सुरुवात कशी करायची ? तेव्हा बटू महाशय विचारतात, “इथे तपासाठी लागणारे कुश गवत, समीधा वगैरे सहज मिळतात ना ?”

दुसऱ्या विषयी काळजी व्यक्त करून संभाषणाची सुरुवात केली म्हणजे काही खास गुण नक्की मिळतात. हो ना? मग यातून आता थोडी अधिक जवळीक साधत बटू विचारतो, “आणि तुझ्यासारखी तरुणी तप करते आहे म्हणून विचारतो. स्वतःला मानवेल इतकेच कष्ट घेतेस ना ? ते महत्त्वाचे. कारण धर्म करण्याचे सगळ्यात मोठे साधन म्हणजे शरीर. त्याची आधी काळजी घ्यायला हवी.” खरे तर किती सहज संभाषणाच्या ओघात आलेले हे वाक्य, पण ते संदर्भ बाजूला ठेवून आज स्वतःच्या तेजाने तळपत आहे. आपल्याला ईश्वराने दिलेली देणगी म्हणजे हे शरीर. त्याच्याकडे दुर्लक्ष करून, ते गृहीत धरून चालणार नाही. तुम्ही म्हणाल माझ्या समोर मोठे ध्येय आहे. मला ‘धर्म’ करायचा आहे. काहीही असले तरी शरीर शक्तीसंपन्न असल्याशिवाय ते शक्य नाही. आपल्याला उपलब्ध साधनांमध्ये ते सगळ्यात प्रथम येते म्हणून ‘आद्य’ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणूनही आद्य.

अशा मौलिक विचारांची पखरण हे कविकुलगुरू कालिदासाचे खास वैशिष्ट्य. ही तर संवादाची सुरुवात आहे. पुढच्या लेखात हा संवाद कसा रंगला ते पाहू.
(लेखिका संस्कृत साहित्याच्या अभ्यासक आहेत.)